Tuesday, October 27, 2026

Mumbai-Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील जोडमार्गावर 1 नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी; नवीन वाहतूक नियम लागू

बोगद्याची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जोडमार्गाच्या वापराबाबत महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून पिकअप व्हॅन, टाटा एस यांसारख्या हलक्या व्यावसायिक वाहनांसह सर्व मालवाहू वाहनांना या जोडमार्गावर बंदी असणार आहे. बोगद्याची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी यासंदर्भात वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. हे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असून, पुढील आदेश येईपर्यंत कायम राहतील.

मालवाहू वाहनांना मूळ द्रुतगती मार्गाचा वापर बंधनकारक

यापूर्वी हलक्या व्यावसायिक वाहनांना जोडमार्गाचा वापर करण्याची परवानगी होती. मात्र, नव्या नियमांनुसार या वाहनांनाही जोडमार्गावर प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे सर्व मालवाहू वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मूळ मार्गाचा वापर करावा लागेल.

दरम्यान, खासगी कार, जीप आणि वाहतुकीसाठी वापरली न जाणारी इतर हलकी मोटार वाहने यांना जोडमार्गावरून प्रवास करण्याची परवानगी कायम राहणार आहे. प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांनाही या मार्गाचा वापर करता येईल.

वेगमर्यादा किती असणार?

नव्या अधिसूचनेनुसार जोडमार्गावर वाहनांच्या प्रकारानुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

  • खासगी कार आणि इतर हलकी मोटार वाहने: ताशी 100 किमी
  • प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहने: ताशी 80 किमी

याशिवाय ज्वलनशील, स्फोटक किंवा अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही जोडमार्गावर प्रवेश करता येणार नाही. अशा वाहनांना मूळ द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागेल.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नव्या नियमांमुळे जोडमार्गावर मालवाहू वाहनांची वर्दळ कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या श्रेणीनुसार मार्ग वापरण्याची परवानगी आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच निर्धारित वेगमर्यादेचे पालन करून बोगद्यातून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या पुणे परिक्षेत्राकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >