मालेगाव : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रकार समोर येत असतानाच मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे दुधाबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रसादासाठी आणलेले दूध उकळल्यानंतर रबरासारखे ताणले जात असल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, संबंधित दुधाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोजागिरीच्या प्रसादासाठी आणलेल्या दुधात विचित्र बदल
रावळगाव येथील ‘सप्तशृंगी देवी मंदिर मंडळा’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने भाविकांना प्रसाद देण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील एका खासगी दूध डेअरीतून दूध खरेदी केले. हे दूध आटवण्यासाठी चुलीवर ठेवले असता, उकळल्यानंतर त्यामध्ये विचित्र बदल दिसून आला. दूध नेहमीप्रमाणे राहण्याऐवजी अधिक चिकट झाले. तसेच उलथणीने वर उचलल्यावर ते रबराप्रमाणे लांब ताणले जात असल्याचे दिसले. दुधाचा हा अनपेक्षित प्रकार पाहून उपस्थित कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
[caption id="attachment_1069583" align="aligncenter" width="800"] नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या ३१ ऑक्टोबर २०२६, शनिवार रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ...
डेअरी मालकाला दिली माहिती
घटनेनंतर मंदिर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित दूध डेअरी मालकाला फोन करून प्रकाराची माहिती दिली. मात्र, कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, डेअरी मालकाने जबाबदारी नाकारली. हे दूध चार ते पाच शेतकऱ्यांकडून संकलित करण्यात आल्याचे सांगत, स्वतः अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला बोलावून तपासणी करून घेण्याचेही त्याने म्हटल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुधामध्ये नेमका काय बदल झाला, त्यामागे भेसळ आहे की अन्य काही कारण, याबाबत अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित दूध डेअरीची तपासणी करावी, दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीनंतरच या प्रकारामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.