Tuesday, October 27, 2026

PM Narendra Modi Prince Alois : भारत-लिश्टनस्टाइन संबंधांमध्ये नवा अध्याय! पंतप्रधान मोदींची युवराज अलोइस यांच्याशी हैदराबाद हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे युवराज अलोइस यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा केली.

नवी दिल्ली : लिश्टनस्टाइनचे युवराज अलोइस (Hereditary Prince Alois) आणि त्यांच्या पत्नी राजकुमारी सोफी सध्या भारताच्या अधिकृत राज्य दौऱ्यावर (State Visit) आले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे युवराज अलोइस यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा केली.

राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली

दिवसाच्या सुरुवातीला युवराज अलोइस आणि राजकुमारी सोफी यांनी राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आणि अभ्यागत पुस्तिकेत (Visitors' Book) आपल्या भावना नोंदवल्या. या प्रसंगी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी उपस्थित होते. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही युवराज अलोइस यांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीदरम्यान उभय देशांतील वाढत्या सहकार्यावर सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

भेटीनंतर डॉ. जयशंकर यांनी सोशल मीडियावर ('X') लिहिले :

"भारताच्या दौऱ्यावर आलेले लिश्टनस्टाइनचे युवराज अलोइस यांची भेट घेणे हा एक उत्तम अनुभव होता. भारत आणि ईएफटीए (EFTA TEPA) कराराच्या माध्यमातून आपल्या द्विपक्षीय संबंधांना एक नवी गती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमुळे दोन्ही देशांतील सहकार्य आणखी पुढे जाईल."

पहिलाच ऐतिहासिक राज्य दौरा : युवराज अलोइस यांचे प्रतिपादन

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवराज अलोइस आणि राजकुमारी सोफी यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. "लिश्टनस्टाइनचा भारतामधील हा पहिलाच ऐतिहासिक राज्य दौरा आहे. भारत आमच्यासाठी किती महत्त्वाचा भागीदार आहे, हेच या दौऱ्यावरून स्पष्ट होते. एका वर्षापूर्वी अंमलात आलेल्या 'भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराने' (TEPA) आपल्या संबंधांमध्ये नवा टप्पा गाठला आहे." त्यांनी पुढे नमूद केले की, "आम्ही या सहकार्याचा विस्तार करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. विशेषतः नाविन्यता (Innovation), प्रगत उत्पादन (Advanced Manufacturing), आर्थिक सेवा (Financial Services), शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकत्र येऊन मोठे काम करू शकतात. दोन्ही देशांच्या आपापल्या क्षमता एकत्र आल्यास याचा दीर्घकालीन फायदा उभय देशांना होईल." याआधी, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या शाही दांपत्याचे औपचारिक आणि भव्य स्वागत करण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा दोन्ही देशांमधील राजनैतिक, व्यापारी आणि आर्थिक सहकार्याला एक नवी दिशा देणारा ठरेल. विमानतळावर आगमन झाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लिश्टनस्टाइनच्या प्रतिनिधींचे स्वागत केले होते. भारतात आगमन झाल्यानंतर युवराज अलोइस यांनी दिल्लीत येण्यापूर्वी आधी मुंबई आणि त्यानंतर वडोदरा या शहरांना भेट दिली. त्यांच्यासोबत लिश्टनस्टाइनमधील प्रमुख उद्योगपतींचा आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मोठा चमू (Delegation) आला आहे. या दौऱ्यादरम्यान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री जयंत चौधरी हे देखील युवराज अलोइस यांची भेट घेणार आहेत.

भारत-लिश्टनस्टाइन संबंधांची पार्श्वभूमी

१९९३ मध्ये भारत आणि लिश्टनस्टाइन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. २०२३ मध्ये या संबंधांना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२५ मध्ये लागू झालेल्या भारत-ईएफटीए (EFTA) करारांनंतर दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांना अधिक बळकटी मिळाली आहे. युवराज अलोइस यांनी यापूर्वी २०१० आणि २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. तसेच फेब्रुवारी २०२६ मध्ये नवी दिल्लीत आयोजित 'एआय इम्पॅक्ट समिट' (AI Impact Summit) साठीही ते भारतात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा सर्व कार्यक्रम आटोपून लिश्टनस्टाइनचे हे शाही शिष्टमंडळ बुधवारी आपल्या देशाकडे रवाना होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >