Girish Mahajan : ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखा, पाण्याचा अवैध उपसा रोखण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणी नियोजनावर भर; पाणीचोरी आणि गळती रोखण्यासाठी विशेष पथके

नाशिक : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उन्हाची तीव्रता आणि बाष्पीभवन वाढण्याची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आतापासूनच करावे. तसेच पाण्याचा अवैध उपसा, पाणीचोरी आणि गळती रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सन २०२६-२०२७ या वर्षासाठी पाटबंधारे प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्याच्या आकस्मिक व प्रासंगिक आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, मालेगावचे रोहित जगताप आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत आदी उपस्थित होते.



पाणी उपसणारे विद्युत पंप बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करा


उन्हाळ्यात वाढणारी उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा वापर जपून करणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच पाण्याचा अपव्यय आणि अवैध उपसा रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. अवैधरीत्या पाणी उपसणारे विद्युत पंप बंद ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. पाणी बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.



धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती काय ?


बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील विविध धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती सादर केली. त्यानुसार,


- गंगापूर धरण समूह : सरासरी ९५ टक्के पाणीसाठा


- गिरणा धरण समूह : सुमारे ९८ टक्के पाणीसाठा


- पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील धरणे : सुमारे ९१ टक्के पाणीसाठा


- मध्यम व लघु धरणे : सुमारे ९६ टक्के पाणीसाठा


जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी त्याचा वापर नियोजनपूर्वक करणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.



पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पथके


जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने आणि कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा, पाणी आरक्षण आणि संबंधित प्रकल्पांची माहिती सादर केली. पाणीचोरी आणि अवैध उपसा रोखण्यासाठी जलसंपदा, महसूल आणि पोलीस विभागाची पथके गठित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची आणि आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेची माहिती महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी दिली.


आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यावर पालकमंत्री महाजन यांनी भर दिला. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता घेतानाच पाणी बचत, अवैध उपसा रोखणे आणि जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Comments
Add Comment

Nashik Sinhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी; त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत मोठा बदल

दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशार्वत तीर्थावर ऐतिहासिक सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा

Devendra Fadnavis: अंजनगाव सुर्जीमध्ये साकारणार संत रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक; ₹80 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायाचा गौरव वाढवणारे संत शिरोमणी रूपलालजी महाराज

Nashik Kumbhmela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक निर्बंध, 30 आणि 31ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनांना 'नो-एंट्री'

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतुकीचे

स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरचा व्हिडिओ व्हायरल; हँडशेक न झाल्याने चर्चांना उधाण, VIDEO पाहून चाहते शॉक

भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 अशी खिशात घालून दणदणीत विजय मिळवला.

IND vs NZ: चौथ्या टी20 सामन्याच्या प्लेइंग 11 मधून वैभव सूर्यवंशीला बाहेर काढा! आर अश्विन असं का म्हणाला?

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे.

महायुतीतील मित्रपक्षांनी आत्मपरीक्षण करावं, शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांचं विधान

आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय अधिक सुकर करण्यासाठी आणि तिन्ही पक्षांमधील परस्पर संवाद अधिक दृढ