नवी दिल्ली: "कालपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी करणारे नेते आता देशभरात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. 28 जागा लढणाऱ्या काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. यावरून स्पष्ट होते की, निवडणूक बॅलेटवर असो वा ईव्हीएम मशीनवर, जनतेचा काँग्रेसवर विश्वास उरलेला नाही," असा जोरदार प्रहार भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, किमान आता तरी राहुल गांधींनी बॅलेट पेपरचा मुद्दा बंद करून जनतेचा कौल स्वीकारावा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, ईव्हीएम असो किंवा बॅलेट पेपर, दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीचे बारा वाजले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीमधील समन्वयाचा अभाव आणि पुण्याचा पराभव
महाराष्ट्रातील निवडणुकीवर भाष्य करताना नवनाथ बन म्हणाले की, महायुतीमध्ये थोडा जरी समन्वय असता, तर पुण्याची जागा भाजपाने जिंकली असती आणि छत्रपती संभाजीनगरची जागाही राष्ट्रवादीला मिळाली असती. पुण्यामध्ये शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, एबी फॉर्म मागे घेतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे एकत्रित निवडणूक लढवण्याऐवजी ऐनवेळेला शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. सचिन सानप यांना मिळालेली सुमारे 16 हजार मते पदवीधर मतदारसंघात भाजपाला मिळाली असती, तर भाजपाच्या स्मिता जाधव पहिल्या फेरीतच विजयी झाल्या असत्या, असा दावा त्यांनी केला. तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तिथेही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणात लवकरच प्रचाराचा धुरळा उडणार आहे! ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ...
रविंद्र धंगेकरांवर कारवाईची मागणी
पुण्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाऊन भाजपा उमेदवाराला मत न देण्याचे जाहीर आवाहन केले होते. निवडणुकीनंतर "शाब्बास पदवीधरांनो!" अशी पोस्ट करणाऱ्या धंगेकरांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत नवनाथ बन म्हणाले, "महायुतीधर्म झुगारून पाठीत खंजीर खुपणाऱ्या अशा झारीतील शुक्राचार्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई करावी." अमरावतीत बंडखोरी करणाऱ्यांना भाजपने तात्काळ सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर कादले, तसेच शिस्तीचे पालन केले. याच धर्तीवर मित्रपक्षानेही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शेवटी केली.