मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यासोबतच मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनीही महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध देखाव्यांतून पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश दिला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सुजाण मुंबईकरांची आणि सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांची साथ लाभल्यामुळे मुंबईचा गणेशोत्सव आता पर्यावरणपूरक उत्सवाकडे अधिक वेगाने वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - 2026’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले.
मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा- 2026’चा तसेच ‘परिमंडळनिहाय आयोजित नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळा स्पर्धा 2026’ या दोन्ही स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात शुक्रवारी 30 ऑक्टोबर 2026 रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुंबईच्या महापौर तावडे बोलत होत्या.
या पुरस्कारवितरण सोहळ्याला उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, शिवसेना गटनेते अमेय घोले, शिक्षण सिमिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ 2) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई सार्वजनिक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे विविक भाटकर, श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव गिरीश वालावलकर तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात विजेत्या मंडळांना चषक, मानधन, प्रमाणपत्र, तुळसकुंडी तसेच सर्वोत्तम नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव उभारणाऱ्या प्रशासकीय विभागांना (वॉर्ड ऑफीस) प्रमाणपत्र व तुळसकुंडी देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान महापौर रितू तावडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या राज्य उत्सवाचा मान मिळालेला श्रीगणेशोत्सव हा संपूर्ण देशाचे आकर्षण असणारा सांस्कृतिक उत्सव आहे. पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना 940 मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित करण्यात आली. तसेच, यंदा 25 हजार 400 लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. मुंबईकरांनी पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला दिलेल्या प्रतिसादाचे फलित म्हणून यंदाही कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देण्यात आले, असे महापौर रितू तावडे म्हणाल्या.
मुंबईत अनेक जाती-धर्मांचे लोक एकत्र येवून सण-उत्सव तर साजरे करतात. एकमेकांच्या रुढी-परंपरा, सण-उत्सवांमध्ये आनंदाने सहभागीही होतात. या उत्सवांतूनच या महानगराची एकात्मता दिसून येते. तसेच या महानगराच्या प्रगतीमागेही याचा मोलाचा वाटा आहे. दरवर्षी येणाऱ्या श्रीगणेशोत्सवातही ही एकात्मता, परंपरा जोपासली जाते, वृद्धिंगत केली जाते, असेही श्री. घाडी म्हणाले. आपल्या मनोगतात उपमहापौर संजय घाडी अस्सल मालवणी बोलीतही उपस्थितांशी संवाद साधत श्रीगणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी महानगरपालिकेने पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच श्रीगणेशोत्सवादरम्यान भाविकांना, नागरिकांना आणि मूर्तिकारांना आवश्यक त्या विविध सेवा-सुविधा महानगरपालिका सक्षमपणे पुरविण्यासह मुंबईतील श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिका दरवर्षी विविध उपक्रम हाती घेत असलेल्या विविध उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. कार्य्रकमाच्या अखेरीस उप आयुक्त (परिमंडळ-2) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी अभार मानले.
मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न घेता, रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात ...
मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीच्या चमूने विविध गीतांसह गणेशवंदना सादर केली. या गणेशवंदनेमुळे श्रीगणेशोत्सव अजूनही सुरू आहे, असे उत्साहावर्धक वातावरण तयार झाल्याचा उल्लेख महापौरांनी आपल्या भाषणात आवर्जून केला. तसेच या चमूला महापौर रितू तावडे यांनी 11 हजार रुपयांचे विशेष बक्षिस देखील जाहीर केले.