Friday, October 30, 2026

Diva Station Megablock: दिवा स्थानकावर विशेष ब्लॉक, दोन एक्स्प्रेसला बसणार फटका; बाकीच्या गाड्यांचं शेड्युल्ड काय?

मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळातील दिवा स्थानकाजवळ येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी प्रवास करणार आहात, तर ही तुमच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळातील दिवा स्थानकाजवळ येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकावर कल्याण स्थानकाच्या दिशेने येत्या शनिवारी, अर्थात 31 ऑक्टोबर 2026 आणि रविवारी अर्थात, 1 नोव्हेंबर 2026 च्या मध्यरात्री दिवा स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून दिवा स्थानकावर कल्याण स्थानकाच्या दिशेने पादचारी पुलासाठी गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील उपनगरीय लोकल आणि लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेससाठी येत्या शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पादचारी पुलावरील गर्डर बसवण्याचं काम रोड क्रेनच्या साहाय्याने पूर्ण केले जाणार आहे. दिवा स्थानकावरील रात्रकालीन मेगाब्लॉकचा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसणार आहे. अनेक लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला हा फटका बसणार आहे.

येत्या शनिवारी, 31 ऑक्टोबर 2026 आणि रविवारी अर्थात, 1 नोव्हेंबर 2026 च्या मध्यरात्री दिवा स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे गर्डर बसवण्याचं काम, 1 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्री 01.10 ते पहाटे 04.25 वाजेपर्यंत असणार आहे. मुंब्रा आणि दातिवली स्थानकादरम्यान, 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील मेल- एक्स्प्रेसला फटका बसणार आहे.

11099 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेस कायम मध्यरात्री 12.45 वाजता सुटते. पण, 1 नोव्हेंबरला ही एक्स्प्रेस पहाटे 4 वाजता सुटेल. तर, 12134 अप मंगळुरू- मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस निळजे स्थानकावर मध्यरात्री 3:34 ते पहाटे 04:25 या वेळेमध्ये थांबवण्यात येणार आहे. ब्लॉकच्यानंतर त्या ट्रेनला सोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >