IND vs NZ 5th T20: पाचव्या सामन्यात न्यूझीलंडच्या मनासारखं, भारताची प्रथम फलंदाजी; श्रेयस अय्यर म्हणाला..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाचवा टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
November 1, 2026 12:11 PM
IND vs NZ 5th T20: पाचव्या सामन्यात न्यूझीलंडच्या मनासारखं, भारताची प्रथम फलंदाजी; श्रेयस अय्यर म्हणाला.. (Photo: ANI)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून शेवटचा सामना होत आहे. पाचवा टी20 सामना हॅमिलटनच्या सेडन पार्क स्टेडियमवर होत आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 3-1 अशी स्थिती असून भारताने मालिका खिशात घातली आहे. आता या मालिकेचा शेवट गोड कोण करणार? याकडे लक्ष लागून आहे. भारताने सलग तीन सामने जिंकले होते, पण चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला नमवत कमबॅक केलं. भारताने सलग चार सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पण पाचव्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या पारड्यात पडला आणि कर्णधार सँटनरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यामुळे भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे.
काय म्हणाला मिचेल सँटनर?
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, 'मी नाणेफेक हरणार हे मी गृहीतच धरलं होतं. आम्ही गोलंदाजी करू. अर्थातच, खेळपट्टी नवीन आहे. नंतर थोडं दव पडण्याची शक्यता आहे. खेळपट्टीच्या आकारमानाशी लवकर जुळवून घ्यावं लागेल. ईडन पार्कप्रमाणे खेळपट्टीवर थोडी उसळी मिळाली तर छान होईल. अर्थातच, या संपूर्ण मालिकेत आमची फलंदाजी चांगली झाली आहे. मागच्या रात्री खेळपट्टी थोडी जास्त आतल्या बाजूला होती, जे वेगवान गोलंदाजांसाठी चांगलं होतं. एक बदल केला आहे. टिकनर परत आला आहे.'
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, 'या ऐतिहासिक मैदानावर येणे हा एक उत्तम प्रसंग आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो, प्रथम फलंदाजी करून स्वतःची परीक्षा घ्यायची होती. ऑकलंडमधील मैदानाचे आकारमान वेगळे होते. पण त्याचे श्रेय द्यायलाच हवे, फिलिप्सने अविश्वसनीय खेळी केली. दोन बदल संघात केले आहेत. वरुण आणि भुवी संघात आले आहेत. तो आपल्या संधीची वाट पाहत होता आणि आज खेळाडूंच्या घोळक्यातही त्याने एक सुंदर भाषण दिले.'
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं दोन वर्षांचं गणित असतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला 2025 पासून सुरूवात झाली आणि 2027 ला अंतिम सामना ...