Monday, November 2, 2026

Nashik : नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिस यंत्रणा अलर्टवर

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून न्यायालय परिसरात तातडीने तपासणी सुरू करण्यात आली आहे. धमकीची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथकाने न्यायालय परिसरात धाव घेतली. पथकाकडून संपूर्ण परिसराची पाहणी आणि तपासणी करण्यात येत आहे. तसेच न्यायालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणांनी सतर्कतेची भूमिका घेतली आहे.

न्यायालयात येणाऱ्या वाहनांची तपासणी

धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकासह पोलिसांकडून परिसराची सुरक्षितता तपासली जात आहे.

धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ

न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाला धमकी मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागील कारण काय आणि संदेशाची सत्यता काय, याबाबत तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >