Monday, November 2, 2026

Nashik : दिवाळीच्या खरेदीसाठी नाशिकच्या बाजारपेठांमध्ये गर्दीचा महापूर

नाशिक : सिंहस्थ ध्वजारोहण, राष्ट्रपतींचा दौरा आणि गोदाआरती यांसारखे महत्त्वाचे व्हीव्हीआयपी कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) नाशिकच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. गेल्या दोन दिवसांपासून निर्बंधांमुळे काहीसा शुकशुकाट असलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर रविवारी वाहनांची अक्षरशः गर्दी झाली. परिणामी रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार आणि एमजी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी कुटुंबासह बाजारपेठांकडे धाव घेतल्याने मध्यवर्ती नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेनरोड आणि एमजी रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एमजी रोडवरून वंदे मातरम् चौक मार्गे दहीपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्राहक, व्यापारी आणि वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. वाहतूक कोंडीचा फटका सार्वजनिक वाहतुकीलाही बसला. सिटीलिंक बसला रविवार कारंजा ते एमजी रोड हे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल २० ते २५ मिनिटे लागली. वाहनांच्या सततच्या हॉर्नमुळे परिसरातील नागरिक आणि दुकानदारही त्रस्त झाले होते.

दोन दिवसांच्या निर्बंधांनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी

राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख बाजारपेठांसह अनेक महत्त्वाचे रस्ते आणि उपरस्ते बंद ठेवण्यात आले होते. त्याचवेळी महापालिकेने मेनरोड आणि गोदाघाट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीमही राबवली होती.

३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींचा दौरा आणि गोदाआरतीचे कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवस साधत नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडले. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. नोकरदार आणि कंपनी कामगारांच्या खात्यात बोनस जमा झाल्यानेही बाजारपेठांमधील उलाढालीला चालना मिळाली. कपडे, दिवाळीचा फराळ आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी रविवार कारंजा, मेनरोड आणि शालिमार परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >