Tuesday, November 3, 2026

Ahilyanagar: माणुसकीच्या दिव्यांनी गरजूंची दिवाळी उजळली; विश्‍वशंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गरजूंना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप

रयत शिक्षण संस्थेच्या विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दीपावलीनिमित्त जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. दीपावलीच्या सणानिमित्त केवळ स्वतःच्या घरात आनंद साजरा न करता समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्याही जीवनात आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावली म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि मांगल्याचा सण! मात्र समाजातील प्रत्येक घटकाला हा सण आनंदाने साजरा करता येतोच असे नाही. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना सणाच्या आनंदापासून वंचित राहावे लागते. अशा कुटुंबांच्या जीवनातही दीपावलीचा आनंद फुलावा, या उदात्त भावनेतून रयत शिक्षण संस्थेच्या विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दीपावलीनिमित्त जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. दीपावलीच्या सणानिमित्त केवळ स्वतःच्या घरात आनंद साजरा न करता समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्याही जीवनात आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. त्यानुसार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने तसेच स्वतः पुढाकार घेऊन दीपावलीसाठी आवश्‍यक असणाऱ्या विविध वस्तू जमा केल्या.

त्यानंतर शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, तसेच रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन गरजू व वंचित नागरिकांना या साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले. हा सामाजिक उपक्रम संस्थेच्या रितू दीदी ॲबट यांच्या प्रेरणेने, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विजय बेरड यांच्या उपस्थितीत, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नारायण अनभुले यांच्या संकल्पनेतून उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक विभागातील सौ. प्रतिभा पाठक, सौ. मनिषा गवळी, भाग्यश्री धोंडे, ज्योती शेळके, रंजिता गलांडे आणि विजय कासार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कविता शिंदे, प्रदीप पाडळे, क्रांती घायतडक आणि जयश्री मोरे यांनीही विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून साहित्य वाटपाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ गरजू व्यक्तींना वस्तूंचे वाटप करण्याचा अनुभव मिळाला नाही, तर समाजातील वंचित घटकांच्या अडचणी समजून घेण्याची संधीही मिळाली. दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे, सहकार्याची भावना जोपासणे आणि सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणे अशा महत्त्वपूर्ण मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे संस्कार होणे आवश्‍यक आहे. याच विचारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना माणुसकीचा प्रत्यक्ष धडा देणारा ठरला. ‘दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खऱ्या अर्थाने दीपावली,’ हा माणुसकीचा सुंदर संदेश देत विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दीपावलीचा खरा साजरा केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >