US Midterm Election : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असतो, तर रिपब्लिकन पक्षाचा मोठ्या फरकाने विजय झाला असता,’ असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांनी निवडणुकीचे निकाल स्वीकारण्याची तयारी दर्शवत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या या दोन्ही विधानांमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
‘मी निवडणुकीत असतो तर मोठा विजय मिळवला असता’
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. ‘मी निवडणुकीच्या बॅलेटवर नव्हतो. जर माझे नाव बॅलेटवर असते, तर आम्ही मोठ्या फरकाने विजय मिळवला असता,’ असा दावा त्यांनी केला. या पोस्टमध्ये त्यांनी 'लँडस्लाइड व्हिक्टरी' अर्थात प्रचंड मताधिक्याने विजय मिळवण्याचा उल्लेख केला. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या पिछाडीची नेमकी कारणे काय आहेत, यावर ट्रम्प यांनी कोणतेही भाष्य केले नाही. उलट, आपण स्वतः निवडणूक लढवली असती तर पक्षाचे चित्र वेगळे असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
US Midterm Election Results : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांनी मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या पिया डंडिया, सुहास ...
निवडणुकीचे निकाल स्वीकारण्यास ट्रम्प तयार
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी निवडणुकीच्या निकालांबाबत महत्त्वाचे विधान केले. मिडटर्म निवडणुकीचे निकाल स्वीकारणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपण निकाल स्वीकारण्यास पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे, तर डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळाल्यास त्यांच्यासोबत काम करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. विरोधी पक्षासोबत काम करण्याची अपेक्षा असल्याचे सांगत, ‘कदाचित आपण काहीतरी मार्ग काढू शकू,’ असेही ट्रम्प म्हणाले.
संसदेत डेमोक्रॅट्सचे वर्चस्व वाढल्यास ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार ?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मिडटर्म निवडणुका होतात. या निवडणुकीत प्रतिनिधी सभेच्या सर्व ४३५ जागांसाठी, तर सिनेटच्या सुमारे एक तृतीयांश जागांसाठी मतदान होते. या निकालांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील बहुमताचे चित्र स्पष्ट होते. जर डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधी सभेत बहुमत मिळवले, तर संसदेतील विविध समित्यांवर त्यांचे नियंत्रण वाढू शकते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांची चौकशी करण्याची आणि सरकारला जाब विचारण्याची संधी विरोधकांना मिळेल.
या समित्यांच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणे, महत्त्वाची कागदपत्रे मागवणे आणि आवश्यकतेनुसार समन्स बजावणे शक्य होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या कामकाजावर विरोधकांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.एकीकडे निवडणुकीत आपण असतो तर मोठा विजय मिळाला असता, असा दावा आणि दुसरीकडे निकाल स्वीकारून विरोधकांसोबत काम करण्याची तयारी... ट्रम्प यांच्या या दुहेरी भूमिकेकडे आता संपूर्ण अमेरिकेचे लक्ष लागले आहे.