Thursday, November 5, 2026

मध्य रेल्वेचे 75 गौरवशाली वर्ष पूर्ण; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दिमाखात साजरी झाली 'हेरिटेज वॉक'

मध्य रेल्वेने 5 नोव्हेंबर 2026 रोजी आपल्या स्थापनेची 75 गौरवशाली वर्षे पूर्ण केली असून, महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 'हेरिटेज वॉक' आयोजित करून हा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मुंबई: भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची 75 गौरवशाली वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त मध्य रेल्वेने 5 नोव्हेंबर 2026 रोजी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वारसा इमारतीत एका विशेष 'हेरिटेज वॉक'चे (वारसा पदयात्रा) आयोजन करून हा सुवर्णदिन उत्साहात साजरा केला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी या 'हेरिटेज वॉक'चे नेतृत्व करत मध्य रेल्वेचा समृद्ध वारसा, वास्तुशिल्पाचे वैभव आणि राष्ट्राच्या विकासातील अमूल्य योगदान अधोरेखित केले.

'ग्रेट इंडियन पेनिन्सुला' (GIP) रेल्वेचा गौरवशाली वारसा लाभलेली मध्य रेल्वे आता राष्ट्राच्या सेवेतील 76 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती, ज्याने देशात रेल्वे वाहतुकीचा पाया रचला. पुढे 5 नोव्हेंबर 1951 रोजी जीआयपी रेल्वेचे 'निझाम स्टेट रेल्वे', 'सिंधिया स्टेट रेल्वे' आणि 'धोलपूर स्टेट रेल्वे' यांच्यासोबत विलीनीकरण करून 'मध्य रेल्वे'ची अधिकृत स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेचे जाळे मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या 5 विभागांमार्फत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकपर्यंत पसरले असून, याद्वारे 492 स्थानकांना जोडले जाते.

मुंबईची जीवनवाहिनी आणि उपनगरीय सेवांचा विस्तार

मुंबईची उपनगरीय रेल्वे प्रणाली ही शहराची खरी जीवनवाहिनी मानली जाते. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला आणि गरजांना सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या नेटवर्कचा सातत्याने विस्तार केला आहे. 1951 मधील 519 वरून उपनगरीय फेऱ्यांची संख्या वाढून 2023 मध्ये 1,860 वर पोहोचली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी आता पारंपरिक गाड्यांसोबतच वातानुकूलित (AC) लोकल सेवांचाही विस्तार केला जात आहे.

पायाभूत सुविधा आणि मालवाहतुकीत मोठी मजल

मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग दिला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 103.58 किमी नवीन व दुहेरी मार्ग कार्यान्वित करण्यात आले असून, गेल्या 5 वर्षांत 1,157.15 किमी रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय, मालवाहतुकीच्या क्षेत्रातही मध्य रेल्वेने उत्तम कामगिरी करत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 8,296 कोटी रुपयांचे विक्रमी मालवाहतूक उत्पन्न (फ्रेट लोडिंग) नोंदवले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत 'कवच' प्रणाली, प्रगत सिग्नलिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. 'वंदे भारत'सारख्या अत्याधुनिक गाड्यांच्या आगमनाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे. मध्य रेल्वेचा हा 75 वर्षांचा प्रवास केवळ एक तांत्रिक प्रगती नसून, तो कोटी कोटी भारतीयांच्या विश्वासाचा आणि प्रगतीचा प्रवास आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >