
मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये मिठाई आणि खव्याच्या खरेदीला वेग आला असतानाच भेसळयुक्त आणि शिळ्या अन्नपदार्थांपासून सावध राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. नागरिकांनी गरजेपुरतीच मिठाई खरेदी करावी. दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक काळ साठवलेली मिठाई किंवा खवा खरेदी करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. मिठाई खरेदी करताना उत्पादनाची तारीख, लेबल आणि त्यातील घटकांची माहिती तपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दिवाळीत मिठाईला मोठी मागणी असल्याने भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ बाजारात येण्याची शक्यता असते. त्यामुळे नामांकित विक्रेत्यांकडून आणि योग्य लेबल असलेली मिठाई व खवा खरेदी करावा. मिठाईला आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणारे भडक रंग टाळावेत. पाकिटावर मिठाई किंवा खव्याच्या निर्मितीची तारीख नमूद असेल, तरच संबंधित पदार्थ खरेदी करावा, असे मुंढे यांनी सांगितले. मिठाईतील सोन्याचा किंवा चांदीचा वर्ख खरा आहे की बनावट, याचीही खातरजमा करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
चांदीचा वर्ख हातात घेतल्यावर विरघळत असेल, तर तो योग्य असल्याचे समजावे; मात्र त्याची अॅल्युमिनियमच्या फॉइलसारखी घडी किंवा गोळी तयार होत असेल, तर तो बनावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्ख असलेली मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मिठाई किंवा खव्यामध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. अशा तक्रारींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मिठाई विक्रेत्यांनीही अन्नपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छतेबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Diwali 2026: दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, फराळ, मिठाई, फटाके. फराळासोबतच मिठाईचीही रेलचेल आपल्या प्रत्येकाच्या घरी असते. काजू कतली, लाडू, बर्फी, पेढे अशा विविध ...
दरम्यान, सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यव्यापी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 1 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील 9 हजार 667 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ६०३ आस्थापनांना सुधारणांसाठी नोटिसा बजावण्यात आल्या, तर ९५४ आस्थापनांचे परवाने निलंबित आणि 25 परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईत 8 हजार 835 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ६४ कोटी ४५ लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी दिली. जप्त केलेल्या अन्नसाठ्याचे प्रमाण 398 टन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या काळात 3 हजार 332 अन्न आस्थापनांची तपासणी करून 1 हजार 501 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. 326 परवाने निलंबित, तर 15 परवाने रद्द करण्यात आले. या मोहिमेत परराज्यांतून आलेला खवा, मावा, दूध, पनीर, खाद्यतेल आणि खाद्यरंग यांचीही तपासणी करण्यात आली. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.






