प्रेमविवाहानंतर पती पैसे कमवण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला, परत आला तेव्हा पत्नीला खुर्चीला बांधलं आणि...
उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला पेटवून दिलं आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
November 5, 2026 01:59 PM
प्रेमविवाहानंतर पती पैसे कमवण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला, परत आला तेव्हा पत्नीला खुर्चीला बांधलं आणि... (Photo: AI/प्रातिनिधीक फोटो)
संशयाला काही औषध नसतं असं म्हंटलं जातं. एकदा संशय घेण्यास सुरूवात झाली की मग काही केल्या मनातून जात नाही. या संशयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं. पण उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील एका बातमीने खळबळ उडाली आहे. कारण ज्या महिलेसोबत प्रेम केलं, तिच्याशी लग्न केलं, त्या पत्नीला पतीने संशयामुळे जिवंत जाळून टाकलं. पोलिसांच्या माहितीनुसार, सदर आरोपी पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा राग त्याला होता. हाच राग मनात धरून त्याने पत्नीला पहिल्यांदा खुर्चीला बांधलं आणि तिच्यावर पेट्रोलचा शिडकावा करून जाळून टाकलं. घरातून आगीचे लोट येत असल्याचं पाहून आसपासच्या लोकांनी धाव घेतली. पण तिथपर्यंत स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृ्त्यू झाला होता. पोलिसांना या प्रकरणाची सूचना मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी पती सुखवीर सिंहला अटक केली.
पोलिसांनी सांगितलं की..
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी प्रेम विवाह केला होता. 11 वर्षांपूर्वी सोनम आणि सुखबीर यांचा विवाह झाला होता. आरोपी पती हिसारमध्ये मजुरी करायचा आणि तेथून परतल्यानंतर त्याने हा प्रकार केला. आरोपी पती सुखवीर सिंहला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने पत्नीवर नजर ठेवण्यास सुरूवात केली होती. त्याच्या अशा वागण्यामुळे दोघांमध्ये कायम खटके उडायचे. एक दिवस पत्नीच्या मोबाईलवर फोन आला आणि त्यातून हा गुन्हा घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Panchkula : हरियाणातील पंचकुला येथील सरकारी शाळेत सहा वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या आठ वर्षीय मुलाला किशोर न्याय ...
घटनेच्या दिवशी काय झालं?
पोलिसांच्या माहितीनुसार, कन्नौजमधील जगतपूर गावात सकळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून आगीचे लोट दिसू लागले. त्यामुळे घरात आग लागल्याचं आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आलं. आग विझवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली, पण नंतर सदर प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. कारण आरोपी सुखवीर सिंहने पत्नीला खुर्चीला बांधून जाळलं होतं. ग्रामस्थांनी या घटनेची कल्पना पोलिसांनी दिली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला, तर आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत आहे. या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.