सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात, टी20 संघाचं कर्णधारपद भूषवणार; आता दोन ट्रॉफीवर नजर
कर्णधार म्हणून भारताला टी20 वर्ल्डकप जिंकून देणारा सूर्यकुमार यादव भारतीय संघातून बाहेर आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियात परतण्याचा मानस आहे. असं असताना सूर्यकुमार यादवला नशिबाची साथ मिळाली आहे.
November 5, 2026 02:36 PM
सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात, टी20 संघाचं कर्णधारपद भूषवणार; आता दोन ट्रॉफीवर नजर (Photo: ANI)
भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकली. पण त्यानंतर त्याला संघात काही स्थान मिळालं नाही. भारताच्या टी20 संघाची धुरा आता श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. तर सूर्यकुमार यादव टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. आता सूर्यकुमार यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. यासाठी एमसीएने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाची धुरा त्याच्या खांद्यावर टाकली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सूर्यकुमार यादव या पर्वात टी20 आणि वनडे फॉर्मेटमध्ये संघाची धुरा सांभाळणार आहे.
सूर्यकुमारला रणजीतून डावललं, कारण...
सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण मागच्या महिन्यात मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून सूर्यकुमार यादवला डावललं होतं.त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. पण असं असूनही त्याला रेड बॉल क्रिकेटमधून डावलण्यात आलं होतं. त्यावेळेस निवड समितीने सूर्यकुमारने गेल्या काही वर्षात रेड बॉल क्रिकेट खेळला नसल्याचा दाखला दिला होता. पण आता व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याचं पुनरामगन झालं असून कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, टीम निवडीपूर्वी 7 आणि 9 नोव्हेंबरला सराव सामने खेळले जातील. त्यानंतर 9 नोव्हेंबरला सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाची निवड केली जाईल. हा संघ 11 नोव्हेंबरला कोलकात्याला रवाना होईल.
वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी नुकतीच मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. या लिलाव प्रक्रियेनंतर स्पर्धा कधी होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली ...
सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर आता सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीवर लक्ष असणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबई संघाचं नेतृत्व कसं करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबईचा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून अभियान सुरू करणार आहे. मुंबईचा पहिला सामना 14 नोव्हेंबरला होणार असून समोर हैदराबाद संघ आहे. एलीट डी ग्रुपमध्ये मुंबईसोबत हैदराबाद, छत्तीसगड, गोवा, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड आणि विदर्भ हे संघ आहेत.