
सिंधुदुर्ग : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते नवी मुंबईदरम्यानच्या विमानसेवेचे तिकीट बुकिंग सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 16 नोव्हेंबर 2026 रोजी FLY91 विमानाचे या मार्गावरील पहिले उड्डाण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार असल्याने सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘येवा, कोकण आपलोच आसा!’ पालकमंत्री नितेश राणेंचे आवाहन
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत या विमानसेवेची माहिती दिली. ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ असे म्हणत त्यांनी प्रवासी आणि पर्यटकांना या हवाई सेवेद्वारे कोकणात येण्याचे आवाहन केले आहे.
Navi Mumbai - Sindhudurg - Navi Mumbai flights booking begins !!! 16th NOV first flight !
येवा कोंकण आपलोच आसा ! https://t.co/2fLnXMNVXp — Nitesh Rane (@NiteshNRane) November 5, 2026
कोकण ते नवी मुंबई प्रवास होणार जलद
सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोकणातून मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असल्याने चाकरमानी, व्यावसायिक, पर्यटक आणि नियमित प्रवाशांना या सेवेचा फायदा होईल.
पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांमुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. नवी मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय स्थानिक व्यावसायिक, उद्योग आणि मुंबई-नवी मुंबईशी नियमित संपर्क ठेवणाऱ्या नागरिकांसाठीही ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सिंधुदुर्गची हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. दररोज विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे कोकण आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, या नव्या हवाई मार्गाकडे प्रवासी आणि पर्यटकांचे लक्ष लागले आहे.






