Friday, November 6, 2026

Pune Crime News: नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांतून 3.72 कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर प्रवाशाला अटक

या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Pune Crime News: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या बॅगेतून 3 कोटी 72 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांमध्ये लपवून हा गांजा आणण्यात आला होता. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खाद्यपदार्थांच्या पाकिटांत लपवला होता गांजा

मिळालेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-291 या विमानाने एक भारतीय प्रवासी बँकॉकहून पुण्यात दाखल झाला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याच्या सामानाची तपासणी केली.

प्रवाशाच्या ट्रॉली बॅगेत नूडल्सची पाकिटे आणि ‘फ्रीज ड्राय मंथोंग ड्युरियन’ नावाने असलेली सुकामेव्याची 9 पाकिटे आढळली. सुरुवातीला ही सामान्य खाद्यपदार्थांची पाकिटे असल्याचे वाटत होते. मात्र, अधिकाऱ्यांनी संशयावरून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा लपवून ठेवल्याचे उघड झाले.

10.642 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त

पाकिटांमध्ये काळ्या प्लास्टिकचे दोन थर आणि त्यामध्ये व्हॅक्यूम सील केलेल्या पिशव्या आढळल्या. या पिशव्यांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या होत्या. कस्टम्सच्या अमली पदार्थ तपासणी किटद्वारे चाचणी केल्यानंतर हा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यांनी एकूण 10.642 किलो गांजा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेले पॅकिंग साहित्य जप्त केले. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 3 कोटी 72 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कस्टम विभागाचे पोलीस उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा