Friday, November 6, 2026

Nana Patekar Memories:  नाना पाटकरांच्या आठवणीत क्रांती रेडकर भावुक, म्हणाली इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'...

याच चित्रपटाच्या निमित्ताने क्रांतीने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतचा एक किस्सा शेयर केला आहे.

Nana Patekar Memories: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रांतीने 'मैत्रेया' (Maitreyaa) नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात काही नाती मैत्रीच्या चौकटीत सहज सामावतात, तर काही नाती नकळत त्या चौकटीच्या पलीकडे जातात. मात्र, त्या नात्याला प्रेम म्हणावं की मैत्री, हेच कळेनासं झालं तर? अशाच एका नात्यातील भावनांचा गुंता उलगडणाऱ्या ‘मैत्रेया’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला समीर वानखेडे, सुदेश भोसले, उर्मिला कानेटकर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. याच चित्रपटाच्या निमित्ताने क्रांतीने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतचा एक किस्सा शेयर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचे नटसम्राट नाना पाटेकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पण आजही त्यांच्या आठवणी कायम आहेत. अनेक सेलिब्रिटी नानांचे अनेक किस्से सांगताना दिसतात. त्यातीलच एक किस्सा क्रांतीने सांगितला. एका मुलाखतीत बोलताना तिनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. हे सांगतानाच क्रांतीने नाना पाटेकरांबाबतचा एक किस्सा सांगितला. क्रांती रेडकरला करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत नानांनी तिला दिलेला सल्ला, पुढे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरल्याचं तिने यावेळी सांगितले आहे.

क्रांती रेडकर काय म्हणाली? मला नानांची एक गोष्ट सांगायची आहे. एकदा एका नाटकाचं रेकॉर्डिंग सुरू असताना तिथे नाना भेटले. त्यांनी मला बघताक्षणी सांगितलं की, एका सिनेमाचं ऑडिशन सुरू आहे. तिथे तुझ्यासारखी सावळी मुलगी हवी आहे, तिथे तू जा. त्यानुसार मी ऑडिशन दिलं; परंतु तिथे माझी निवड झाली नाही..." त्यानंतर काही दिवसांनी माझ्या 'आमच्यासारखे आम्हीच' या मालिकेचं शूटिंग सुरू झालं. त्यावेळी मी खूप वाईट अभिनय करायचे. नानांनी माझी ती मालिका पाहिली आणि मला फोन केला. ते म्हणाले, आता मला कळलं त्यांनी तुझी निवड का केली नाही ते... अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं? तेव्हा मी त्यांना सॉरी म्हटलं. तेव्हा त्यांनी मला कमी आणि नैसर्गिक अभिनय करायला सांगितलं. अशाच प्रकारे अनेक कलाकार मला काही ना काही शिकवत गेले..."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >