मुंबई : मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक अपघातात अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आईसोबत रस्त्यावरून जात असताना एका भरधाव कारने चिमुकल्याच्या ट्रायसायकलला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो दोन गाड्यांच्यामध्ये दबला गेला. कृषिव मांडविया असे या निष्पाप बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालक डॉ. समीर पारेख (वय ४८) याला अटक केली होती, मात्र अवघ्या एका दिवसात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
रात्रीच्या वेळी आईसोबत फिरताना घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कृषिवची आई रिद्धी मांडविया या त्याला ट्रायसायकलवर बसवून घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. रात्री ९.४५ च्या सुमारास त्या बोरिवली पश्चिम येथील चांदवरकर रोडवरील ॐ शांती चौकाजवळून घरी परतत होत्या. डॉन बॉस्को स्कूल रोडच्या दिशेने जाण्यासाठी त्या पंजाबी लेनजवळ रस्ता ओलांडत असतानाच ही भीषण दुर्घटना घडली.
दोन गाड्यांच्या मध्ये चिरडला गेला चिमुकला
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भयानक घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका ४५ वर्षीय कॅब चालकाने ...
आई-मुलगा रस्ता ओलांडत असताना समोरून एक किआ (Kia) कार जात होती. त्याच वेळी एका लाल रंगाच्या भरधाव एसयूव्ही (SUV) कारने यू-टर्न घेताना थेट ट्रायसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, आई रिद्धी रस्त्यावर दूर फेकल्या गेल्या, तर कृषिवची ट्रायसायकल किआ कारच्या दिशेने घासली गेली. त्यानंतर एसयूव्ही कारने किआ कारच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली. या दोन्ही गाड्यांच्या मध्ये चिमुकल्याची ट्रायसायकल पूर्णपणे दाबली गेल्याने कृषिवच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
अपघातानंतर आरोपी चालकाने स्वतःच त्या चिमुकल्या बालकाला तातडीने एका जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, शताब्दी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत किंवा पोहोचताच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे बोरिवली परिसरात तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केले अटक
याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी डॉ. समीर पारेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे), कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि कलम १२५(ब) (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे) तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी पहाटे आरोपीला अटक केली होती.
न्यायालयाचा पोलिसांना सवाल; आरोपीला विना-बॉण्ड जामीन
गुरुवारी आरोपी डॉक्टरला बोरिवली येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी शिवदत्त एम. पाटील यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने पोलिसांना सुनावत विचारले की, गुन्ह्यामध्ये लावलेली सर्व कलमे जामीनपात्र असताना तुम्ही पोलीस कोठडीची मागणी का करत आहात ? तुम्ही आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना ? असा सवाल करत न्यायालयाने कोणत्याही जामीन पत्राशिवाय (Bond) आरोपीला जामीन मंजूर केला. तसेच, या प्रकरणाचे तपास अधिकारी सागर पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
दुसरीकडे, आरोपीचे वकील प्रदीप कुमार विश्वकर्मा आणि कृष्णा कांबळे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, प्रसारमाध्यमांत आणि लोकांमध्ये पसरवल्या गेलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला नाही, उलट त्याने स्वतः मुलाला रुग्णालयात नेले आणि त्याला वाचवण्यासाठी सीपीआर (CPR - कृत्रिम श्वासोच्छ्वास) देण्याचाही प्रयत्न केला. हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता, कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे घडले नव्हते.
सुखी आणि आनंदी कुटुंबावर कोसळला वज्राघात
मृत लहान मुलगा कृषिव आपल्या आई-वडिलांसह आणि आजी-आजोबांसोबत बोरिवली पश्चिम येथील चांदवरकर रोडवरील 'पार्श्व दर्शन' इमारतीत राहत होता. त्याचे वडील एका बहुराष्ट्रीय (MNC) कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी असून तिने नुकतीच कठीण मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. घरात सर्व काही सुरळीत सुरू असताना, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे मांडविया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.