Nashik Crime : नाशिक कारागृहातील बंदीवानांवर लक्ष ठेवण्याची आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कारागृह रक्षकानेच नियमांना हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आला आहे. गुप्तांगाजवळ चिकट टेपच्या साहाय्याने चरस लपवून कारागृहात नेण्याचा आणि तो बंदीवानांना विक्री करण्याचा संशयिताचा प्रयत्न सुरक्षा तपासणीदरम्यान उधळण्यात आला. या कारवाईत ३३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला असून, संबंधित रक्षकाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगझडतीदरम्यान प्रकार उघड
या प्रकरणातील संशयिताचे नाव रविंद्र एकनाथ पाटील (वय अंदाजे ३५) असे असून, तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कारागृह रक्षक म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या झडती कक्षात नियमित तपासणी सुरू होती. यावेळी संशयित पाटील याने चरस हा प्रतिबंधित अंमली पदार्थ गुप्तांगाखाली चिकट टेपच्या साहाय्याने लपवून ठेवल्याचे तपासणीत आढळले. बंदीवानांना विक्री करण्याच्या उद्देशाने हा पदार्थ कारागृहात नेण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे. कारागृह रक्षक नारायण जयसिंग राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंगझडती घेतली असता हा प्रकार समोर आला.
या घटनेप्रकरणी कारागृह रक्षक नारायण जयसिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडून ३३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुवनेश्वर घनदाट करीत आहेत.
Nashik Citylink Bus : सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी ...
कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याकडूनच अशा प्रकारचा प्रयत्न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारागृहातील गैरप्रकार, बंदीवानांकडून मोबाईलचा वापर, अंमली पदार्थांचे सेवन, कर्मचाऱ्यांवरील हल्ले आणि अन्य गैरवर्तनाच्या घटनांमुळे यापूर्वीही सुरक्षा व्यवस्थेवर टीका झाली आहे. आता थेट कारागृह रक्षकाकडूनच चरस तस्करीचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारागृहाची विशेष तपासणी करावी तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चरस म्हणजे नेमके काय ?
चरस हा गांजा वनस्पतीपासून मिळणाऱ्या चिकट राळेपासून तयार होणारा अंमली पदार्थ आहे. यामध्ये टीएचसी (THC) हा मनावर आणि मेंदूवर परिणाम करणारा घटक असतो. चरसच्या सेवनामुळे स्मरणशक्ती, विचारक्षमता आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. भारतात एनडीपीएस कायद्यानुसार चरसचे बेकायदेशीर उत्पादन, बाळगणे, विक्री आणि तस्करी करणे दंडनीय अपराध आहे. कारागृहाच्या भिंतीआड नेमके काय सुरू आहे? सुरक्षेची जबाबदारी असणारेच संशयाच्या भोवऱ्यात सापडत असतील, तर कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.