Friday, November 6, 2026

तहलका फेम तरुण तेजपालला मोठा झटका! 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार!

2013 च्या बलात्कार प्रकरणात पत्रकार तरुण तेजपाल यांना 10 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, त्यांची जामीनावर सुटकेची मागणी फेटाळली आहे.

नवी दिल्ली: पत्रकार तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सुनावलेली 10 वर्षांची शिक्षा निलंबित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट नकार दिला आहे. या निर्णयामुळे तेजपाल यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार असून, दिवाळीच्या तोंडावर जामीन मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मात्र, न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मंजुरी दिली असून, आता या प्रकरणाची कायदेशीर लढाई आणखी लांबणीवर पडली आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सुनावणीदरम्यान तरुण तेजपाल यांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी हे प्रकरण फेटाळून लावताना घटनेच्या वेळी लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मुद्द्यांचा हवाला दिला. लिफ्ट उघडण्याच्या अवघ्या 2 मिनिटे 9 सेकंदांच्या वेळेत असा प्रकार घडणे अशक्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला, तसेच पीडितेचा जबाब खोटा असल्याचा दावा केला.

दुसरीकडे, गोवा सरकारतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तेजपाल आणि पीडितेमधील चॅटचे मेसेज न्यायालयासमोर सादर केले, ज्यामध्ये आरोपीने पीडितेची माफी मागितली होती. तसेच, पीडिता ही आरोपीच्या मित्राची मुलगी असून त्याच्या मुलीची मैत्रीण असल्याचे सांगत, तिच्याकडे खोटा गुन्हा दाखल करण्याचे कोणतेही कारण नव्हते, असा जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने प्राथमिक निरीक्षण नोंदवत सध्यातरी शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे, परंतु शिक्षा वाढवण्याच्या राज्य सरकारच्या अपिलासोबतच तेजपाल यांच्या अपिलावरही सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

उल्लेखनीय आहे की, 2013 मध्ये ‘तहलका’ मासिकाचे तत्कालीन संपादक असलेल्या तरुण तेजपाल यांच्यावर एका हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिला सहकाऱ्याचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी 2021 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले होते. परंतु, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फेटाळून लावत त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती, ज्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >