दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती घराची साफसफाई, फराळाची लगबग, नवीन कपड्यांची खरेदी, आकाशकंदील, रांगोळी, पणत्या आणि कुटुंबासोबत साजरा होणारा आनंदाचा क्षण! प्रत्येकाच्या दिवाळीच्या आठवणी वेगळ्या असतात. लहानपणी आईसोबत केलेली साफसफाई असो, मित्रांसोबत बनवलेला किल्ला असो किंवा गरमागरम फराळाचा आस्वाद असो, या आठवणी कायम मनात घर करून राहतात. काळानुसार जबाबदाऱ्या वाढल्या, कामाचं स्वरूप बदललं, तरी दिवाळीचा उत्साह मात्र कायम असतो.
सनई चौघडे फेम राज हंचनाळे, म्हणजेच जय याने दिवाळीच्या आठवणी शेयर करताना, "असं म्हणतात, 'देव जेव्हा देतो, तेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतो.' यंदा मला याचा खऱ्या अर्थाने अनुभव येतोय. या वर्षी दिवाळीत माझ्या आयुष्यात लक्ष्मी दोन रूपांत आली आहे. एक माझी छोटी मुलगी आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम! आमच्या शोला 'बेस्ट शो'चा पुरस्कार मिळाला, आमच्या कामाचं कौतुक होतंय आणि रोज सोशल मीडियावर लोकांचे मेसेज येत आहेत. हे सगळं माझ्यासाठी खूप आनंददायी आणि भारावून टाकणारं आहे. प्रत्येकाचे मनापासून आभार! यंदाची दिवाळी मी माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या छोट्या लक्ष्मीसोबत पारंपरिक पद्धतीने, खूप आनंदाने साजरी करणार आहे. मी नेहमी म्हणतो की, माझे प्रेक्षक हेच माझे गॉडफादर्स आहेत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
मुंबई : राज्यात सगळीकडे दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण आहे. नोकरदार वर्ग ऑफिसमध्ये आनंदाने दिवाळी साजरी करतात. त्याच अनुषंगाने दीपावलीनिमित्त ‘आपलं ...
विजया बाबर, म्हणजेच कमळी हिने सांगितले, "सध्या दिवाळीच्या साफसफाईत आणि फराळ बनवण्यात माझं योगदान खूप कमी असतं. खरं तर, कुठलाही सण असला की त्याच्या तयारीच्या वेळी मी शूटिंगमध्ये व्यस्त असते. त्यामुळे सध्या आईला जास्त मदत करता येत नाही. पण लहानपणी मी दिवाळीच्या तयारीत आईला खूप मदत करायचे. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे ताई, दादा आणि पप्पा आपापल्या कामासाठी बाहेर असायचे. शाळा किंवा कॉलेजमधून घरी आल्यानंतर मीच आईसोबत असायचे. त्यामुळे घराची साफसफाई आम्ही दोघी मिळून करायचो. मला फराळ बनवायला खूप आवडतं. लहानपणी मी आईला रंगरंगोटी ने केलेले साधे दिवे आणायला सांगायचे. मग ते दिवे मी घरी बसून छान रंगवायचे. माझ्या हाताने रंगवलेला दिवा दिवाळीच्या दिवशी घरात लावला जातो, याचा मला खूप आनंद व्हायचा."
तर सगळ्यांची लाडकी आपली 'तारिणी' म्हणजेच शिवानी सोनारने आपल्या आठवणी शेयर करताना सांगितले की ,"दिवाळी हा माझ्यासाठी नेहमीच आवडता सण राहिला आहे. कारण या सणाला सलग दोन-तीन दिवस सुट्टी मिळते. मला दिवाळीचा सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे आमची दिवाळी जवळपास १०-१२ दिवस साजरी होते. ते मला फार आवडत. मालिकांमधील सेटवरच्या कुटुंबासोबत आणि घरच्या कुटुंबासोबत अशा दोन्हीकडे आम्हाला दिवाळी साजरी करता येते. दोन्हीकडे फराळ असतो, फराळ बनवण्याची तयारी आणि लगबग असते. घरातही सजावट होते आणि सेटवरही सजावट होते. त्यामुळे दिवाळीचा आनंद आम्हाला जास्त दिवस घेता येतो. यंदाच्या दिवाळीसाठी मी खूप उत्सुक आहे, कारण यावर्षी घराच्या सजावटीची जबाबदारी माझी आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी ऑनलाइन खरेदी करतेय. खरं तर मला दुकानात जाऊन खरेदी करायला जास्त आवडलं असतं, पण तेवढा वेळ मिळत नाही. मला एक सुंदर आकाशकंदील घ्यायचा आहे. मला षटकोनी आकाराचा, टिपिकल एकाच रंगाचा आकाशकंदील खूप आवडत. त्यामुळे सध्या मी माझ्या आवडीचा आकाशकंदील शोधतेय. तो मिळाला की त्याच्यासोबतचा फोटो नक्कीच सोशल मीडियावर पोस्ट करेन.
आम्ही कामानिमित्त मुंबईत राहतो. माझं माहेर आणि सासर दोन्ही पुण्यात आहे. माझा भाऊ बेंगळुरूला असतो. पण दिवाळी हा असा सण आहे, ज्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतो आणि खूप मजा करतो. भाऊबीज असो किंवा पाडवा, या सगळ्या सणांमधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा मला खूप आवडते. लहानपणी मी आणि माझा भाऊ मिळून किल्ला बनवायचो. सध्या शूटिंगमुळे तेवढा वेळ मिळत नाही, पण यंदा वेळ मिळाला तर मला नक्कीच किल्ला बनवायला आवडेल. किल्ला बनवण्यासाठी वयाचं बंधन नसतं. त्यासाठी माती गोळा करणं, वेगवेगळ्या आकाराचे दगड आणणं, पोती आणणं, धान्य तयार करणं, मावळे विकत घेणं किंवा जुन्या मावळ्यांना रंग देणं, या सगळ्या गोष्टींची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे माझ्यासाठी फराळापेक्षाही दिवाळीत किल्ला बनवण्यात जास्त रस आहे."