
Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचा आधुनिक चेहरा ठरलेल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ने प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. देशातील विविध मार्गांवर धावणाऱ्या या ट्रेनला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असून, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण भारतातील मंगळुरू ते तिरुवनंतपुरम मार्गावर नोंदवली गेलेली तब्बल 189.35 टक्के व्याप्ती (Occupancy Rate) होय. उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवाशांची मागणी या मार्गावर जवळपास 1.9 पट अधिक असल्याचे यावरून स्पष्ट होते.
व्याप्ती 100 टक्क्यांच्या पुढे कशी जाते?
सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की, ट्रेनमधील जागा निश्चित असताना व्याप्ती 189% कशी असू शकते? याचे उत्तर म्हणजे 'व्याप्ती' म्हणजे एका वेळेस ट्रेनमधील प्रवासी नसून, संपूर्ण प्रवासादरम्यान झालेला जागांचा वापर होय. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवासी वेगवेगळ्या स्थानकांवर चढतात आणि उतरतात. एका प्रवाशाने सोडलेली तीच जागा पुढच्या टप्प्यात दुसऱ्या प्रवाशाला मिळते. यामुळे मार्गाच्या विविध टप्प्यांवर एकाच सीटचा वापर अनेकदा होतो आणि एकूण व्याप्ती 100% पेक्षा अधिक होते.
प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांच्या शाही विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरु झाली आहे. ...
प्रवाशांच्या संख्येत 34 टक्क्यांची वाढ
अधिकृत आकडेवारीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 3.98 कोटी प्रवाशांनी वंदे भारतने प्रवास केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (2.97 कोटी) तुलनेत या प्रवाशांच्या संख्येत तब्बल 34 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. एप्रिल 2026 पर्यंत वंदे भारतच्या माध्यमातून 9.1 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून देशभरात जवळपास 1 लाख फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यात 'नवी दिल्ली-वाराणसी' मार्ग आघाडीवर असून या मार्गावर आतापर्यंत 73 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.
वंदे भारत 'स्लीपर' सेवेलाही जोरदार प्रतिसाद
केवळ 'चेअर कार' नव्हे, तर लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वेने 'वंदे भारत स्लीपर' सेवाही सुरू केली आहे. जानेवारी 2026 मध्ये सुरू झालेल्या हावडा-कामाख्या मार्गावरील पहिल्या स्लीपर ट्रेनची सरासरी व्याप्ती 114.54 टक्के इतकी नोंदवली गेली. त्यानंतर नुकतीच 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली-वाराणसी मार्गावर आणि पुढे बेंगळुरू-मुंबई मार्गावरही नवीन स्लीपर सेवा सुरू करण्यात आली आहे.
सध्या देशभरात वंदे भारतच्या 81 चेअर कार जोड्या आणि ३ स्लीपर जोड्या—अशा एकूण 84 जोड्या (168 सेवा) कार्यरत आहेत. या वाढत्या आणि यशस्वी जाळ्यामुळे भारतीय रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडली असून, केवळ दक्षिण रेल्वेच्या वंदे भारत सेवांचा महसूल वाढून 803 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. प्रवाशांचा हा वाढता ओघ पाहता आगामी काळात वंदे भारत रेल्वेचा प्रवास आणखी सुखाचा आणि विस्तारीत होणार यात शंका नाही.






