सशस्त्र दलांमध्ये सेवा देणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकारने सुधारित अग्निपथ योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे. आता अग्निवीरांना चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लग्न करण्याची परवानगी मिळणार आहे. यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर कायमस्वरूपी सेवेसाठी निवड झालेल्या 25 टक्के अग्निवीरांचा तसेच दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेल्या अग्निवीरांचाही समावेश असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुधारित अग्निपथ योजना 04 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यानुसार लग्नावरील निर्बंध फक्त सुरुवातीच्या चार वर्षांच्या सेवाकाळातच लागू राहणार आहेत. साडेसतरा ते 21 वयोगटातील तरुण-तरुणी या योजनेत भरतीसाठी पात्र असतात.
अग्निवीरांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत, याबाबत माहिती देण्यासाठी तिन्ही दलांकडून विशेष जनजागृती कार्यक्रम राबवला जात आहे. यात दुसऱ्या टप्प्यातील दोन वर्षांच्या सेवेदरम्यान लग्नाच्या प्रकरणांवरही चर्चा केली जात आहे. मुदतवाढ घेणाऱ्या अग्निवीरांची वैवाहिक स्थिती तपासली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश अग्निवीरांना योग्य निर्णय घेण्यास मदत करणे हा आहे. कारण आता नागरी नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी असलेला आरक्षण कोटा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सरकारे, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि इतर संस्थांनी जाहीर केलेला कोटा आता रद्द झाला आहे. कारण अग्निवीर आता पूर्ण मुदतीची लष्करी सेवा निवडू शकतात.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा ...
दुसऱ्या टप्प्यातील सेवेत असलेल्या अग्निवीरांची रजा वाढवण्याचाही विचार सुरू आहे. सध्या अग्निवीरांना सुरुवातीच्या कार्यकाळात 30 दिवसांची रजा मिळते, तर नियमित सैनिकांना एकूण 90 दिवसांची रजा मिळते. लष्कराकडून चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये तैनात करण्याचा विचारही सुरू आहे. यापूर्वी अग्निवीरांना अशा अतिरिक्त तैनातीपासून वगळण्यात आले होते. सुधारित योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून ती सध्या सेवेत असलेल्या 03 लाख अग्निवीरांना लागू होणार आहे. 31 डिसेंबरनंतर भरती होणाऱ्या नव्या अग्निवीरांसाठी आणखी बदल होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांची मुदतवाढ पूर्ण केल्यानंतर सर्व अग्निवीर पात्रता आणि संमतीच्या अटींनुसार कायमस्वरूपी होणार आहेत.