मुंबई : गेल्या काही महिन्यांत दैनंदिन वापरातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. दूध, तूप, साबण, डिटर्जंट पावडर आणि सिगारेट यांसारख्या रोजच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अमूल आणि मदर डेअरने १२ नोव्हेंबरपासून दुधाचे दर वाढवले आहेत, तर कर्नाटकमध्ये नंदिनी ब्रँडने १ नोव्हेंबरपासूनच दूध आणि दही महाग केले आहे. केवळ घरगुती वस्तूच नव्हे, तर हॉटेल-व्यवसाय आणि प्रवासात वापरला जाणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच विमानाचे इंधन (ATF) देखील महागले आहे. कोणत्या वस्तूला आता किती जादा पैसे मोजावे लागत आहेत, याचा हा सविस्तर आढावा :
१. दूध आणि दह्याच्या दरात वाढ
आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट एकत्र येणार डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नव्या मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मची सुरुवात मुंबई : या नव्या ...
मदर डेअरी (दिल्ली-एनसीआर) : दुधाचा खरेदी खर्च वाढल्यामुळे मदर डेअरीने प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दूध आता ७२ रुपयांवरून ७६ रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर टोंड दूध ६० रुपयांवरून ६२ रुपये झाले आहे. याशिवाय सुट्टे टोंड दूध ६० रुपये, डबल टोंड ५६ रुपये आणि गाईचे दूध ६५ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.
अमूल दूध : चारा, पशुखाद्य, पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे अमूलने 'ताजा' दूध प्रतिलिटर २ रुपयांनी आणि 'गोल्ड' दूध प्रतिलिटर ४ रुपयांनी महाग केले आहे.
नंदिनी (कर्नाटक) : कर्नाटकमध्ये नंदिनी ब्रँडने दुधाच्या दरात प्रतिलिटर तब्बल ८ ते १२ रुपयांपर्यंत मोठी वाढ केली आहे. टोंड दूध ४६ रुपयांवरून ५४ रुपये झाले आहे, तर स्पेशल टोंड आणि शुभम दूध ५२ रुपयांवरून ६४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच दह्याच्या दरातही वाढ झाली असून ५०० ग्रॅम दह्याचे पाकीट ३४ रुपये (६ रुपयांनी वाढ) आणि १ लिटरचे पाकीट ६८ रुपयांना (१४ रुपयांनी वाढ) मिळत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा : कर्नाटक सरकारने दूध खरेदी दरात प्रतिलिटर ८ रुपयांची वाढ केली आहे. यातील ७ रुपये थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर १ रुपया दूध संघांच्या व्यवस्थापनासाठी वापरला जाईल.
२. तूप, लोणी (बटर) आणि पनीर झाले महाग
अमूल उत्पादने : दिवाळीच्या आधीच अमूलने १ किलो तुपाचा डबा ६३० रुपयांवरून ६८० रुपये केला आहे, तर ५०० ग्रॅम शुद्ध तुपाचे पाकीट ३२५ रुपयांवरून ३४५ रुपयांवर गेले आहे. तसेच ५०० ग्रॅम बटरची किंमत १५ रुपयांनी वाढून ३२५ रुपये झाली आहे.
नंदिनी आणि आविन (इतर ब्रँड) : बंगळुरूमध्ये नंदिनीचे १ लिटर तूप १३५ रुपयांनी वाढून ८५० रुपयांवर पोहोचले आहे. ५०० ग्रॅम बटर ३८० रुपयांना मिळत असून २०० ग्रॅम पनीरसाठी ११५ रुपये मोजावे लागत आहेत. तामिळनाडूमध्ये 'आविन' कंपनीने १०० मिली तुपाचा डबा ९५ रुपये (८० रुपयांवरून) आणि २०० मिलीचा डबा १८० रुपयांना (१६० रुपयांवरून) केला आहे.
३. डिटर्जंट, साबण आणि सिगारेटचे नवे दर
सर्फ एक्सेल आणि साबण : हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) कंपनीने सर्फ एक्सेल, रिन, व्हील आणि मोती साबणाच्या किमतीत १ ते १० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. १ किलो 'सर्फ एक्सेल क्विक वॉश' आता २४५ रुपयांना (१० रुपयांनी वाढ) मिळते. ५०० ग्रॅम 'व्हील' पावडर ४७ रुपये आणि १५० ग्रॅम 'मोती गुलाब' साबण ८२ रुपयांना विकला जात आहे.
गोल्ड फ्लेक सिगारेट : ITC कंपनीने १० सिगारेटच्या 'गोल्ड फ्लेक प्रीमियम' पाकिटाची किंमत १२५ रुपयांवरून १३५ रुपये केली आहे. विशेष म्हणजे, या वर्षी जून महिन्यात झालेल्या दरवाढीपूर्वी हेच पाकीट ११५ रुपयांना मिळत होते.
४. व्यावसायिक गॅस आणि विमान इंधनाचे दर
एलपीजी सिलिंडर : दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरची किंमत ऑक्टोबरमध्ये ६२.५० रुपयांनी आणि नोव्हेंबरमध्ये १० रुपयांनी वाढल्यामुळे आता तो २,८२० रुपयांना मिळत आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडर ९४२ रुपयांवर स्थिर आहे. देशातील इतर शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर मुंबईत २,७७५ रुपये, कोलकातामध्ये २,९७१ रुपये आणि चेन्नईमध्ये २,९९४.५० रुपये नोंदवले गेले आहेत.
विमानाचे इंधन (ATF) : विमानांच्या इंधनात १ नोव्हेंबर रोजी प्रतिलिटर १.३७ रुपयांची वाढ झाल्यामुळे दर १३८.५० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या सलग चार महिन्यांत ATF चे दर सतत वाढले आहेत.
५. सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) देखील महागले
समोर आलेल्या माहितीनुसार, बाजारात तुटवडा निर्माण झाल्यामुळे, वाढलेला वाहतूक खर्च आणि चलनातील बदलांमुळे सुकामेव्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिस्त्याचे दर ६० ते ७० टक्क्यांनी वाढले आहेत, तर बदामाच्या किमतीत २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.