Nashik : नाशिकमध्ये दिवाळीच्या उत्साहाला आगीचे गालबोट ! फटाक्याची ठिणगी अन् गोदाम जळून खाक

नाशिक : दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना नाशिक जिल्ह्यात आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी मोठे नुकसान झाले आहे. येवला शहरात फटाक्याच्या ठिणगीमुळे फळांचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, तर सायगाव शिवारात मक्याच्या गंजीला लागलेल्या आगीत तीन एकर क्षेत्रातील चारा जळून खाक झाला. या घटनांमुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.



येवल्यात फटाक्याच्या ठिणगीने फळांचे गोदाम जळून खाक


येवला शहरातील बाजारतळ परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हाजी बाबा दर्ग्यासमोरील भाजी मार्केटजवळ असलेल्या फळांच्या गोदामाला फटाक्याच्या ठिणगीमुळे अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. गोदामात साठवून ठेवलेली केळी, सफरचंद आणि फळांचे प्लास्टिक कॅरेट आगीत जळून खाक झाले. त्यामुळे गोदाम मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. वेळेत अग्निशमन बंब पोहोचल्याने आगीचा फैलाव आजूबाजूच्या दुकानांपर्यंत झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दिवाळीच्या काळात फटाके फोडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले जात आहे.



सायगाव शिवारात मक्याच्या गंजीला भीषण आग


दरम्यान, येवला तालुक्यातील सायगाव शिवारातही आगीची दुसरी घटना घडली. येथे महेश परशराम सोनवणे या शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला अचानक आग लागली. या आगीत सुमारे तीन एकर क्षेत्रातील चारा जळून पूर्णपणे राख झाला. यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही सोनवणे यांनी जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी तीन एकर क्षेत्रातील चारा खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी प्रति एकर ८ हजार रुपये याप्रमाणे एकूण २४ हजार रुपये खर्च केले होते. मात्र, आगीच्या दुर्घटनेमुळे त्यांची संपूर्ण मेहनत आणि खर्च वाया गेला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चारा वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठ्या प्रमाणातील चारा जळून गेला.



आग विझवण्यासाठीही शेतकऱ्याला भरावे लागले ४,४१० रुपये


या घटनेनंतर आणखी एका मुद्द्यामुळे शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन वाहनाच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून ४ हजार ४१० रुपयांचे शुल्क आकारल्याचे समोर आले आहे.आधीच दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना जनावरांचा साठवलेला चाराही आगीत जळून गेला. त्यात अग्निशमन सेवेसाठी शुल्क भरावे लागल्याने सोनवणे कुटुंबावर दुहेरी संकट ओढवले आहे. आता जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.



दिवाळीत आगीच्या घटनांमुळे येवला परिसरात हळहळ


दिवाळीच्या आनंदोत्सवात येवला शहर आणि ग्रामीण भागात घडलेल्या या दोन दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका बाजूला व्यापाऱ्याचे फळांचे गोदाम जळून नुकसान झाले, तर दुसरीकडे शेतकऱ्याचा जनावरांसाठी साठवलेला चारा आगीत नष्ट झाला. त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाके फोडताना नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

RBI Rules News :आता तुम्ही बँक खात्याशिवाय पैशांची देवाणघेवाण करू शकता, RBI चा 'हा' नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशांतर्गत मनी ट्रान्सफर (DMT) बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या

स्मार्टफोनसाठी GaN चार्जर खरेदी करावा का ? जाणून घ्या फायदे आणि तोटे

आजकाल नवीन स्मार्टफोन खरेदी करताना अनेक कंपन्या बॉक्समध्ये चार्जर देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना फोनसाठी

PM Narendra Modi : 'तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहात...'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला तो रंजक किस्सा, जेव्हा पत्रकारानं दिली होती आनंदाची बातमी

टीम इंडियाच्या विमानाला लँडिंगसाठी लागली तब्बल 26 मिनिटे; वेलिंग्टनमध्ये खेळाडूंचा जीव टांगणीला, नेमकं काय घडलं?

भारत न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताची 2-0 ची आघाडी कायम राहिली. पण चौथ्या

Teacher Promotion Stay: जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीला तूर्त स्थगिती

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचे

Nanded News: 'दुष्काळात तेरावा महिना'! रील बनवण्याच्या नादात फटाक्यांची आतषबाजी; पाच एकर ऊस जळून खाक, Video

नांदेंड : महाराष्ट्रात आधीच भीषण दुष्काळजन्य परिस्थिती असताना, नांदेडमधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.