RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशांतर्गत मनी ट्रान्सफर (DMT) बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे बँक खाते नाही असे लोकही बँकेच्या शाखेत जाऊन पैसे पाठवू शकतात. आता, तुमचे बँक खाते नसले तरीही दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवणे अधिक सोपे होणार आहे. कसे ते जाणून घेऊया.
RBI च्या नव्या नियमांनुसार, नागरिक आता बँकेच्या शाखेत जाऊन दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात 50,000 पर्यंतची रक्कम हस्तांतरित करू शकतात. त्यासाठी पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक नाही. याचा अर्थ असा की, तुमचे स्वतःचे बँक खाते नसले तरीही, तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवू शकता. यासाठी बँकेची कॅश पे-इन सुविधा आणि एनईएफटी (NEFT) वापरता येईल. याव्यतिरिक्त, बिझनेस करस्पॉन्डंट्स (BCs) आणि एटीएमद्वारे देखील पैसे हस्तांतरण उपलब्ध होईल. हे नवे नियम 11 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाले आहेत.
नव्या नियमामागील उद्देश व फायदा
ज्यांच्याकडे आवश्यक ओळखपत्र किंवा पत्त्याची कागदपत्रे नाहीत, त्यांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. याचा विशेषतः इतर शहरांमध्ये काम करणाऱ्या मजूर आणि स्थलांतरित कामगारांना फायदा होऊ शकतो.
आरबीआय नियम
- या नव्या सुविधेअंतर्गत, बँका खातेधारकाच्या खात्यातून अशा व्यक्तीला निधी हस्तांतरित करू शकतात, ज्याचे बँकेत खाते नाही.
- तसेच सुविधेअंतर्गत लाभार्थ्याला प्रत्येक व्यवहारात जास्तीत जास्त ₹10,000 रोख आणि दरमहा एकूण ₹25,000 पर्यंत रक्कम काढता येऊ शकते. लाभार्थी ही रक्कम एटीएम, बिझनेस करस्पॉन्डंट (बीसी) किंवा इतर अधिकृत पेमेंट चॅनेलद्वारे काढू शकतात.
- रोख ठेव सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांची नोंदणी करणे आवश्यक असेल. यासाठी ग्राहकाचा मोबाईल क्रमांक आणि स्वयं-साक्षांकित अधिकृत असेल.