Thursday, November 12, 2026

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंपाचा विशेष अभ्यास, जीएसआयचे पथक तैनात

नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच त्र्यंबकेश्वर परिसरातील भूगर्भीय हालचालींचा अभ्यास करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्य शासनाच्या विनंतीनुसार भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) त्र्यंबकेश्वर परिसरात विशेष पथक पाठवले आहे. या पथकाकडून परिसरातील भूगर्भीय हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. यासाठी चार अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात येत असून, जमिनीत होणाऱ्या कंपनांची सातत्याने नोंद घेतली जात आहे.

कुंभमेळ्याच्या कामांच्या सुरक्षिततेवर लक्ष

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून लाखो भाविक, साधू-महंत आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेसह विविध विकासकामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असल्याने या परिसराची भूगर्भीय स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. संभाव्य भूकंपाचा धोका लक्षात घेऊन भविष्यातील बांधकामांचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी जीएसआयचा हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे.

चार अत्याधुनिक यंत्रांद्वारे चोवीस तास निरीक्षण

जीएसआयच्या पथकाकडून त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात बसवण्यात आलेल्या चार यंत्रांच्या मदतीने जमिनीतील कंपनांची सलग नोंद केली जात आहे. या नोंदी विशेष संगणकीय प्रणालीद्वारे एकत्रित करून त्यांचे विश्लेषण केले जाणार आहे. त्यातून परिसरातील भूकंपविषयक हालचालींचे स्वरूप आणि संभाव्य धोके समजण्यास मदत होईल.

अभ्यासानंतर राज्य सरकारला अहवाल

या निरीक्षण मोहिमेचा कालावधी तीन महिन्यांचा असून, अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जीएसआयकडून राज्य शासनाला सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. नागपुरात बोलताना जीएसआयचे महासंचालक दिनेश गणवीर यांनी या अभ्यासाची माहिती दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात असताना भूगर्भीय परिस्थितीचा आधीच आढावा घेतला जात आहे. त्यामुळे भविष्यातील विकासकामांचे नियोजन अधिक सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी या अभ्यासाचे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >