Thursday, November 12, 2026

Prahaar Marathi News Live Updates : नरेंद्रन यांची टाटा इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 12 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
Live Updates

Prahaar Marathi News Live Updates : नरेंद्रन यांची टाटा इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

टाटा इंटरनॅशनल लिमिटेडने गुरुवारी टी. व्ही. नरेंद्रन यांची नवीन अध्यक्ष आणि नोएल टाटा यांची मानद अध्यक्ष म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली. या दोन्ही नियुक्त्या आजपासून लागू झाल्या आहेत. नोएल टाटा वयाच्या ७० व्या वर्षी टाटा समूहाच्या सहा प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळातून पायउतार होत असताना हा नेतृत्वबदल झाला आहे.

Prahaar Marathi News Live Updates : मुंबई-पुण्याला बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह 5 ठिकाणे रडारवर

मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा उल्लेख करण्यात आला असून, विमानतळ, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसा, मुंबईतील बँक, कोर्ट,महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका मेलमधून देण्यात आली आहे. महानगर पालिकेचा उल्लेख असल्याने पालिकेत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. तपासणी पूर्ण केल्यानंतर शेवटी अद्यापत तरी काहीही संशयास्पद आढळलं नाही.

Prahaar Marathi News Live Updates : स्वच्छतेत नवी मुंबई देशात नंबर १! मंत्री गणेश नाईक यांच्याकडून अभिनंदन

देशातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत सातत्याने अग्रभागी राहणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोच्च यश संपादन केले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये देशात नवी मुंबई शहराने प्रथम क्रमांक पटकावत देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी सर्व नवी मुंबई करांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी, नवी मुंबईला स्वच्छ शहर पुरस्कार मिळाला याचा अभिमान आहे, आता हा पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच नवी मुंबईतील नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो, असे म्हंटले आहे. तसेच त्यांनी सर्व प्रशासन, महापालिकेचे कर्मचारी, आयुक्त, महापौर, नगरसेवक यांचे देखील अभिनंदन केले आहे.

Prahaar Marathi News Live Updates : छेडछाड करत तरुणीला लोकलखाली ढकलल्याप्रकरणी आरोपी जितेंद्र हिरमुखेला अटक

बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल छेडछाड केल्यानंतर तिला रेल्वे रुळांवर ढकलल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आता आरोपी जितेंद्र हिरमुखेला अटक करण्यात आली आहे.

Prahaar Marathi News Live Updates : सोलापूर विमानतळाच्या धावपट्टीवर प्रशिक्षणार्थी विमान घसरलं

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शिकाऊ महिला वैमानिक विमानाचे टेक ऑफ घेत असताना विमान धावपट्टीवरून घसरून खाली गेले. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात विमानातील महिला वैमानिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान, या घटनेबाबत सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Prahaar Marathi News Live Updates : नवीन कसारा घाटात अपघात; एकाचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी

मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहापूर जिल्हा उपरूग्णालयात दाखल केले आहे. हे सर्व एका सिमेंटच्या गाडीने मालेगावहून भिवंडीला येत होते. नवीन कसारा घाटात घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक बाजूला असलेल्या दरडीला आदळला व पलटी झाला. पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य घटनास्थळी दाखल होत अपघात ग्रस्तांना मदत केली.

Prahaar Marathi News Live Updates : सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष; रणजित देशमुख उपाध्यक्षपदी!


अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल 03 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर झाला. आज 12 नोव्हेंबर रोजी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी सुजय विखे पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी रणजित देशमुख यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलने 17 जागांवर विजय मिळवून बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या बँकेच्या 21 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित जागांसाठी मतदान व मतमोजणी झाली.

Prahaar Marathi News Live Updates : आयटीसीने 2026 मध्ये दुसऱ्यांदा वाढवल्या 'गोल्ड फ्लेक प्रीमियम'च्या किमती

सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे, कारण आयटीसी कंपनीने गोल्ड फ्लेक प्रीमियम सिगारेटच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. 10 सिगारेटच्या पॅकची किंमत आता 125 रुपयांवरून 135 रुपये झाली असून यात 10 रुपयांची वाढ झाली आहे. 2026 मध्ये ही दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात याच पॅकची किंमत 115 रुपयांवरून 125 रुपये करण्यात आली होती. म्हणजेच एकूण वाढ सुमारे 17.4 टक्के झाली आहे. वाढत्या करांमुळे आणि खर्चामुळे कंपनीने ही दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे, मात्र वारंवार वाढणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांवर बोजा वाढत आहे.

Prahaar Marathi News Live Updates : धक्कादायक! लोकलमध्ये तरुणीची छेडछाड; विरोध करताच नायगाव स्थानकात रुळांवर ढकलले

बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेडछाड केल्यानंतर तिला रेल्वे रुळांवर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 नोव्हेंबर रोजी नायगाव रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने कोपरापासून कापावा लागला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Prahaar Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, बेपत्ता झालेल्या दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) जवानांचे मृतदेह गुरुवारी दच्छन परिसरातील जंगलात आढळून आले. दोन्ही जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Prahaar Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान तटकरे-फडणवीस भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी मंगळवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर बुधवारी तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या गाठीभेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, ही भेट दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले.


Prahaar Marathi News Live Updates : स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये नवी मुंबई देशात अव्वल; 4,751 शहरांना मागे टाकत मिळवला पहिला क्रमांक

स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबईने पुन्हा एकदा देशात आपली छाप पाडली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील 4,751 शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे नवी मुंबईला देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Prahaar Marathi News Live Updates: रब्बी हंगामासाठी केंद्राकडून ६२ हजार ३७० कोटींची तरतूद

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने २०२६-२७च्या रब्बी हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांच्या पोषक तत्त्वाधारित अनुदानाच्या (एनबीएस) दरांना मंजुरी दिली असून, यासाठी ६२ हजार ३७०.०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत अनुदानात २४ हजार ४१७.७३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डीएपी खताची ५० किलोची गोणी १ हजार ३५० रुपये या दरानेच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Prahaar Marathi News Live Updates: महिला आणि लघुउद्योजकांना दिलासा! केंद्र सरकारकडून पतहमी योजनांसाठी 9,111 कोटींचा निधी मंजूर

Business News: महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि सूक्ष्म उद्योजकांना तारणाशिवाय कर्ज मिळणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन पतहमी योजनांना पुढील 5 वर्षांसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 'स्टँड-अप इंडिया' निधीसाठी 4,111 कोटी रुपये, तर 'मायक्रो युनिट्स' निधीसाठी 5,000 कोटी रुपये असे एकूण 9,111 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >