Friday, November 13, 2026

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सौदी अरेबियाच्या उड्डाणांवरील निर्बंध वाढवले; रियाध-दम्माम सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने सौदी अरेबियासाठीच्या काही उड्डाणांवरील निलंबन वाढवले आहे. रियाध आणि दम्मामची उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत, तर जेद्दाहची उड्डाणे 21 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. प्रवाशांना उपलब्धतेनुसार विनाशुल्क तारीख बदलण्याची किंवा पूर्ण परतावा घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

मुंबई : मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांनी सौदी अरेबियासाठीच्या काही उड्डाणांवरील निलंबनाची मुदत वाढवली आहे. रियाध आणि दम्माम येथून येणारी-जाणारी विमानसेवा 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत बंद राहणार आहे. तर जेद्दाहसाठीची उड्डाणे 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत निलंबित ठेवण्यात येणार आहेत.

रियाध आणि दम्मामची उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

एअर इंडियाने शुक्रवारी प्रवाशांसाठी जारी केलेल्या प्रवासविषयक सूचनेत ही माहिती दिली. प्रदेशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची रियाध व दम्माम येथून येणारी-जाणारी उड्डाणे 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत निलंबित राहतील, असे कंपनीने स्पष्ट केले. जेद्दाहसाठीची विमानसेवा मात्र 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गांवर प्रवासाचे नियोजन केलेल्या भारतीय प्रवाशांना आपल्या प्रवासाच्या तारखा आणि विमानसेवेची सद्यस्थिती तपासावी लागणार आहे.

इंडिगो आणि अकासा एअरनेही वाढवली होती निलंबनाची मुदत

यापूर्वी 10 नोव्हेंबर रोजी इंडिगोने जेद्दाह आणि मदिना येथून येणारी-जाणारी उड्डाणे 21 नोव्हेंबरपर्यंत निलंबित ठेवण्याची घोषणा केली होती. तसेच अकासा एअरने गुरुवारी रियाध आणि जेद्दाहसाठीच्या सर्व उड्डाणांवरील निलंबन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवले होते. त्यामुळे सौदी अरेबियासाठीच्या विमानसेवेवर अनेक भारतीय विमान कंपन्यांनी निर्बंध कायम ठेवल्याचे चित्र आहे.

प्रवाशांना तारीख बदलण्याची किंवा पूर्ण परतावा घेण्याची सुविधा

एअर इंडियाने प्रवाशांना काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 10 नोव्हेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी निश्चित केलेल्या तिकिटांसाठी प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे.

  • रियाध आणि दम्माम : नोव्हेंबर महिन्यातील प्रवासासाठी उपलब्धतेनुसार कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता तारीख बदलता येईल.
  • जेद्दाह : 21 नोव्हेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी उपलब्धतेनुसार विनाशुल्क तारीख बदलण्याची सुविधा असेल.
  • तिकीट रद्द केल्यास : प्रवाशांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा