मुंबई : मायक्रोसॉफ्ट ३६५ (Microsoft 365) च्या यंत्रणेत अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जगभरातील लाखो युजर्सना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या तांत्रिक समस्येमुळे ऑफिसच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे आउटलुक (Outlook), मायक्रोसॉफ्ट टीम्स (Teams), शेअरपॉईंट ऑनलाईन (SharePoint Online) आणि एआय असिस्टंट कोपायलट (Copilot) या सेवा पूर्णपणे बंद पडल्या होत्या. या जागतिक बिघाडाचा मोठा फटका भारतालाही बसला आहे. इंटरनेट सेवा आणि ॲप्समधील अडीअडचणींवर लक्ष ठेवणारी कंपनी 'डाऊनडिटेक्टर' (Downdetector) च्या मते, आज सकाळी ९ वाजेपर्यंत भारतातील ८०० हून अधिक युजर्सनी मायक्रोसॉफ्टच्या सेवा बंद असल्याच्या अधिकृत तक्रारी नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे, बरीच धडपड करूनही ही सेवा अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.
अवघ्या एका तासात ७४ देशांमध्ये पसरली समस्या
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. ...
डाऊनडिटेक्टरने दिलेल्या आकडेवारीनुसार, हा तांत्रिक बिघाड अतिशय वेगाने पसरला आणि अवघ्या एका तासात जगातील तब्बल ७४ देशांना त्याची बाधा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी भारतीय वेळेनुसार रात्री ११:३० च्या सुमारास जगभरातून आउटलुक बंद असल्याच्या तक्रारींचा महापूर आला होता. त्या वेळी एकाच तासात सुमारे १ लाख ४० हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या, जे नेहमीच्या प्रमाणापेक्षा तब्बल २,००० पटीने जास्त होते. रात्री ९:४५ वाजता सुरू झालेला हा प्रॉब्लेम सलग आठ तास उलटूनही कायम होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बाधित युजर्सची संख्या घटकर २८,००० च्या खाली आली, तरीही पूर्ण आराम मिळालेला नाही. मायक्रोसॉफ्टने आपल्या अधिकृत सूचनेत (MO1550821) स्पष्ट केले आहे की, युजर्सना एक्सचेंज ऑनलाईन, टीम्स, शेअरपॉईंट, कोपायलट आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर एक्सडीआर (Defender XDR) वापरताना मोठ्या अडचणी येत आहेत. याशिवाय, अझ्यूर (Azure), वनड्राईव्ह (OneDrive) आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअरच्या सेवाही विस्कळीत झाल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.
नक्की बिघाड का झाला ? मायक्रोसॉफ्टचे स्पष्टीकरण
सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने विविध प्रदेशांतून युजर्सचा वाढलेला ताण (elevated load) हे यामागचे कारण सांगितले होते. मात्र, नंतर त्यांनी आपले स्पष्टीकरण बदलले. 'ब्लीपिंग कॉम्प्युटर'च्या अहवालानुसार, ट्रॅफिक वाढल्यामुळे नाही, तर अचानक अनेक मुख्य सर्व्हर्स बंद पडल्यामुळे सुरुवातीला उरलेल्या सर्व्हर्सवर अतिरिक्त भार पडला आणि यंत्रणा कोलमडली, असे कंपनीने मान्य केले. ज्या सर्व्हर्समध्ये बिघाड झाला, त्यांच्या एका मुख्य प्रक्रियेवर (core process) मोठा ताण आल्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता थंडावली होती. यावर मात करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने तातडीने सर्व नवीन अपडेट्स थांबवले, जगभरातील ट्रॅफिकची योग्य विभागणी केली आणि सर्व्हर्स पुन्हा सुरू (restart) करण्याचे काम हाती घेतले. तसेच, अलीकडेच केलेले काही तांत्रिक बदल मागे घेतल्यास यंत्रणा लवकर पूर्ववत होईल का, याची चाचपणी सुरू आहे. सध्या कंपनीचे तांत्रिक काम युद्धपातळीवर सुरू असले तरी त्याचा वेग संमिश्र आहे. काही सर्व्हर्स सुरू केल्यानंतर आणि ट्रॅफिक दुसऱ्या मार्गावर वळवल्यानंतर सेवा थोडीफार सुरू झाली होती; पण नवीन बदल अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. यंत्रणेवर एकदम ताण येऊ नये म्हणून युजर्सना टप्प्याटप्प्याने जोडले जात आहे. त्यामुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यास अजून काही वेळ लागेल, असा इशारा कंपनीने दिला आहे. दरम्यान, याच गुरुवारी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत सुमारे एक तास टीम्सची सेवा खंडित झाली होती. तो प्रॉब्लेम वेगळा होता की याच बिघाडाचा भाग होता, याबाबत कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही.
हा कोणताही 'सायबर हल्ला' नाही : ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण
हा तांत्रिक बिघाड पाहून जगभरात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचे गृह आणि सायबर सुरक्षा मंत्री टोनी बर्क यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा कोणताही सायबर हल्ला नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. सन २०२४ मध्ये 'क्राउडस्ट्राईक'च्या एका सदोष अपडेटमुळे जगभरातील विंडोज संगणक जसे अचानक बंद पडले होते, अगदी तसाच हा तांत्रिक प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या बिघाडाचा सर्वाधिक फटका ईमेल सेवांना बसला आहे.
इतर एआय कंपन्यांनाही बसली झळ
मायक्रोसॉफ्टच्या या डाऊनटाइमचा फटका केवळ त्यांच्याच ग्राहकांना बसला नाही, तर इतर टेक कंपन्यांच्या कामातही अडथळा निर्माण झाला. 'ओपनएआय' (OpenAI) ने सांगितले की, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरशी जोडलेले त्यांचे कनेक्शन काही प्रमाणात बाधित झाल्याने त्यांची काही टूल्स योग्य प्रकारे काम करत नाहीत. तसेच 'अँथ्रोपिक' (Anthropic) या कंपनीनेही मायक्रोसॉफ्ट ३६५ सोबतच्या त्यांच्या लिंक्समध्ये प्रॉब्लेम आल्याचे जाहीर केले. या बिघाडाचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट खात्यांना फारसा बसला नाही; मात्र कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालये आणि व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'एंटरप्राइज' खात्यांवर चालणारे आउटलुक, टीम्स आणि इतर कळीचे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद पडले होते. चालू वर्षात मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे; यापूर्वी जानेवारी महिन्यातही असाच मोठा प्रॉब्लेम समोर आला होता.