Thursday, November 12, 2026

Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

मात्र, काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा एसयूव्हीला आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

नरिमन पॉइंट ते वरळी मार्गावर अपघात

प्राथमिक माहितीनुसार, नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुरुवातीला दोन वाहनांची टक्कर झाली. त्यानंतर काही वाहने घटनास्थळी थांबली होती. याचवेळी भरधाव वेगाने येणारी महिंद्रा एसयूव्ही अनियंत्रित झाल्याचा आरोप आहे. या एसयूव्हीने थांबलेल्या वाहनांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसयूव्हीला आग लागली. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

दारूच्या नशेत वाहन चालवले होते का? पोलिसांकडून तपास

अपघाताच्या वेळी एसयूव्ही चालक दारूच्या नशेत होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघात नेमका कसा घडला आणि त्यामागील कारण काय, याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >