TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडली. त्यातही रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सध्या नव्या ‘रामायण’ चित्रपटातील यशने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेची चर्चा सुरू असताना अरविंद त्रिवेदी यांच्या अभिनयाचीही पुन्हा आठवण काढली जात आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अरविंद त्रिवेदी यांची मुलगी कविता ठाकूर यांनी वडिलांना रामायण मालिकेत रावणाची भूमिका कशी मिळाली, यामागचा खास किस्सा सांगितला आहे. विशेष म्हणजे, अरविंद त्रिवेदी हे रावणाच्या भूमिकेसाठी नव्हे, तर केवटाच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते.
१०० कलाकारांच्या ऑडिशननंतर अरविंद त्रिवेदी यांची निवड
कविता ठाकूर यांनी सांगितल्यानुसार, अरविंद त्रिवेदी रामायण मालिकेच्या शूटिंग सेटवर पोहोचले, तेव्हा रावणाच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू होते. यापूर्वी जवळपास १०० कलाकारांचे ऑडिशन झाले होते. मात्र, रामानंद सागर यांना रावणाच्या भूमिकेसाठी योग्य कलाकार मिळत नव्हता. दरम्यान, अरविंद त्रिवेदी केवटाच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला आले होते. त्यावेळी रामानंद सागर यांनी त्यांना रावणाची वेशभूषा परिधान करण्यास सांगितले आणि काही संवाद बोलायला दिले. अरविंद त्रिवेदी यांनी आपल्या खास शैलीत रावणाचे संवाद सादर केले. त्यांचा अभिनय पाहून रामानंद सागर प्रभावित झाले. ऑडिशन संपवून अरविंद त्रिवेदी बाहेर जात असताना रामानंद सागर यांनी त्यांना थांबवले आणि म्हणाले, 'तुम्ही कुठे चाललात? अखेर मला माझा रावण मिळाला!' अशा प्रकारे केवटाच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेलेल्या अरविंद त्रिवेदी यांची रावणाच्या भूमिकेसाठी निवड झाली.
वीकेंड आला की अनेकांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मनोरंजनासाठी नेमकं काय पाहावं? काही जण मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करतात, तर काहींना घरी बसून ...
रावणाची भूमिका साकारल्यानंतर अरविंद त्रिवेदी यांना का वाटायची खंत ?
अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. मात्र, पडद्यावर रावणाचे पात्र साकारताना त्यांना अनेकदा मनातून वाईट वाटायचे. यामागचे कारणही त्यांच्या मुलीने सांगितले. कविता यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद त्रिवेदी यांची भगवान श्रीरामांवर अतूट श्रद्धा होती. त्यामुळे मालिकेत अभिनय करताना त्यांना अनेकदा भगवान श्रीरामांविषयी अपमानास्पद संवाद बोलावे लागत असत. हे संवाद बोलल्यानंतर त्यांना मनातून अपराधी वाटायचे. शूटिंग संपल्यानंतर ते भगवान श्रीरामांची पूजा करायचे आणि त्यांच्याकडे क्षमा मागायचे. अनेकदा ते तासनतास पूजा करण्यात घालवायचे. एकीकडे पडद्यावर ते रावणाच्या भूमिकेत दिसायचे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जीवनात त्यांच्या मनात प्रभू श्रीरामांविषयी प्रचंड भक्तिभाव होता.
आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे अरविंद त्रिवेदी यांचा रावण
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील अरविंद त्रिवेदी यांचा रावण आजही प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय पात्र आहे. त्यांच्या दमदार आवाजाने, अभिनयशैलीने आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने या भूमिकेला वेगळी उंची मिळवून दिली. त्यामुळेच आज नव्या रामायण चित्रपटातील रावणाच्या भूमिकेची चर्चा होत असताना अरविंद त्रिवेदी यांच्या अभिनयाची तुलना केली जात आहे. त्यांच्या भूमिकेमागील श्रद्धा आणि भक्तीचा किस्सा ऐकल्यानंतर चाहत्यांनाही त्यांच्याबद्दल अधिक आदर वाटत आहे.