गुरुग्राम : देशातील 'मिलेनियम सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि चकचकीत रोषणाईने नटलेल्या गुरुग्राम शहरातील महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका जोडप्यासाठी ही रात्र एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हती. दिवाळीच्या रात्री सेक्टर ७० परिसरात एका संशयित व्हॅनने जवळपास एक किलोमीटरपर्यंत एका जोडप्याच्या कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या थरारक अनुभवातून सुखरूप बचावलेले गुरुग्रामचे रहिवासी शुभम जैन यांनी सोशल मीडियावर आपल्या सोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार सविस्तरपणे मांडला आहे.
नेमकी घटना कशी घडली ?
Crime News : खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; दोन अल्पवयीनांसह चौघांना बेड्या
मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खासगी व्हिडिओ ...
शुभम जैन यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपल्या कारमधील डॅशबोर्ड कॅमेऱ्याचे (Dashcam) व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना दिवाळीच्या रात्री ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास गुरुग्राममधील सेक्टर ७० जवळील दरबारपूर रोडवर घडली. त्या रात्रीचा थरारक अनुभव सांगताना शुभम यांनी लिहिले की, "सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी नेहमीप्रमाणे आमच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जेव्हा त्या गाडीने अचानक पुढे येऊन जोरात ब्रेक दाबले आणि गाडीतून काही तरुण खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा मला काहीतरी गंभीर गडबड असल्याचा संशय आला. कोणताही धोका न पत्करता मी जीवाची बाजी लावून थेट माझ्या हाउसिंग सोसायटीच्या गेटपर्यंत कार सुसाट वेगाने पळवली. त्या संपूर्ण प्रवासात त्या अज्ञात हल्लेखोरांनी अनेकदा माझी कार आडवी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला."
'अंगावर अजूनही काटा येतोय...'
हा जीवघेणा प्रसंग आठवताना आजही अंगावर काटा येत असल्याचे शुभम जैन यांनी म्हटले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ती संशयित व्हॅन थेट त्यांच्या सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पाठलाग करत पोहोचली होती. सोसायटीच्या गेटवर पोहोचताच तेथील सुरक्षारक्षकांनी तत्परता दाखवत त्या संशयित गाडीला अडवले. विशेष म्हणजे, सुरक्षारक्षकांनी रोखल्यानंतरही त्या तरुणांची दादागिरी कमी झाली नाही. त्यांनी गेटवरच तब्बल २० मिनिटे थांबून सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि सोसायटीच्या आत सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असेही जैन यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. या प्रकारामुळे ते जोडपे प्रचंड दहशतीखाली असून, दिल्ली-एनसीआर परिसरातील रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुरुग्राम पोलिसांची तात्काळ दखल
सोशल मीडियावर शुभम जैन यांची पोस्ट आणि डॅशकॅम व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी या घटनेची तात्काळ आणि गंभीर दखल घेतली आहे. शुभम यांच्या पोस्टला उत्तर देताना गुरुग्राम पोलिसांनी म्हटले आहे की, "आम्ही या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. कृपया पुढील त्वरित आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी तुमची नोंदवलेली तक्रार आणि संपर्क माहिती आम्हाला वैयक्तिक मेसेजद्वारे (DM) पाठवा." दरम्यान, या घटनेमुळे रात्रीच्या वेळी कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.