Saturday, November 14, 2026

पेन्शन धारकांनो लाईफ सर्टिफिकेट दाखल करण्याचं काम 30 नोव्हेंबरपूर्वी उरका; अन्यथा पेन्शनवर होऊ शकतो परिणाम!

जर तुम्ही सुद्धा पेन्शन धारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 30 नोव्हेंबरच्या आधी लाईफ सर्टिफिकेट सबमिट करण्याची माहिती देण्यात आली आहे. अन्यथा तुमच्या पेन्शनवर परिणाम होऊ शकतो.

मुंबई: निवृत्ती वेतन धारकांच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना फार महत्त्वाचा असतो. वर्षभर प्रत्येक महिन्याला निवृत्ती वेतन सुरळीत येण्यासाठी, सर्व पात्र पेन्शनर धारकांना दरवर्षी त्यांच्या हयातीचे प्रमाणपत्र अर्थात लाईफ सर्टिफिकेट बँकेमध्ये सादर करणे आवश्यक असते. यंदा, हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. जर एखाद्या पेन्शनर धारकाने दिलेल्या मुदतीत आपल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही तर, त्यांची डिसेंबर महिन्यापासूनची पेन्शन बंद केली जाऊ शकते किंवा थांबवली जाऊ शकते. जर तुम्ही सुद्धा पेन्शन धारक असाल तर आत्ताच तुमचं लाईफ सर्टिफिकेट सबमिट करून घ्या.

EPFO कार्यालयाला आणि तुमच्या सरकारी कार्यालयाला लाईफ सर्टिफिकेट सादर केल्यानंतर तुम्ही तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा मिळतो. निवृत्तीवेतन देणाऱ्या संस्था, जसे की बँका आणि पोस्ट ऑफिस, निवृत्तीवेतनाची रक्कम योग्य व्यक्तीच्या खात्यात जमा होत आहे, याची खात्री करण्यासाठी दरवर्षी हे सर्टिफिकेट सादर करावे लागते. पूर्वी, पेन्शन धारकांना त्यांचे दाखले सादर करण्यासाठी बँका किंवा कार्यालयांमध्ये लांब रांगेत थांबायला लागायचे. परंतु आता डिजिटल सेवांमुळे ही प्रक्रिया खूप सोप्पी झाली आहे. तुम्हाला शक्य असेल तर, तुमच्या ज्या बँकेमध्ये पेन्शनचं खातं आहे त्या बँकेत किंवा EPFO कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचं लाईफ सर्टिफिकेट सबमिट करू शकता.

पेन्शन धारकांना आता त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी बँकेत जाऊन लांब रांगेमध्ये उभं राहण्याची काही गरज नाही. तुम्ही भारत सरकारच्या 'उमंग' ॲपचा वापर करून घरबसल्या सहजपणे तुमचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवू शकणार आहेत. सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून तुमच्या स्मार्टफोनमध्ये 'उमंग' ॲप डाउनलोड करा. ॲप सुरू केल्यानंतर, तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा. तुमच्या मोबाईलवर मिळालेल्या ओटीपीचा वापर करून व्यवस्थित लॉग ईन करून घ्या. त्यानंतर, ॲपच्या सर्च बॉक्समध्ये 'जीवन प्रमाण' किंवा 'जीवन प्रमाणपत्र' असे टाईप करा आणि संबंधित सेवा निवडा. त्यानंतर तिथे पेन्शनधारकाला तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) क्रमांक, निवृत्तीवेतन देणारी संस्था आणि बँकेचा तपशील यासह आवश्यक माहिती भरावी लागेल.

त्यानंतर, आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन किंवा बायोमेट्रिक प्रोसेस पूर्ण करावी लागेल. फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर करू शकता. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर, एक डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार केले जाईल आणि तुमच्या मोबाईल फोनवर 'प्रमाण आयडी' पाठवला जाईल. पुढील स्थिती तपासणीसाठी हे प्रमाणपत्र सुरक्षितपणे जपून ठेवा. याची प्रिंटआउट घेऊन बँकेत जाण्याची गरज नाही, कारण ते थेट डिजिटल माध्यमाद्वारे संबंधित संस्थेपर्यंत पोहोचते. जर कोणत्याही पेंशन धारकाला ऑनलाइन पद्धत वापरायची नसेल, तर ते इतर पर्याय निवडू शकतात. पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत घरी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोफत घरपोच सेवा देतात. बहुतेक सार्वजनिक आणि खाजगी बँका जीवन प्रमाणपत्रांची घरपोच सेवा देतात.

याव्यतिरिक्त, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा EPFO ​​कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. जर तुमची 30 नोव्हेंबर ही तारीख जर मुकली तर, तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळणार नाही. तुम्ही जेव्हा तुमचं लाईफ सर्टिफिकेट सादर कराल, त्याच्यानंतरच तुम्हाला रोखून ठेवलेली पेन्शनची रक्कम थकबाकीसह पुढील पेमेंट सायकलमध्ये दिली जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >