Friday, November 13, 2026

Nashik Crime : लग्नास नकार दिल्याचा संताप अनावर, तरुणीचं थेट बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केलं अन्...; नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : लग्न करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरात उघडकीस आली आहे. तरुणीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच तिला मारहाण करून हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक पांढरंग डहाळे (वय २३, रा. जेके टायरजवळ, दसक जेलरोड, नाशिकरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

मैत्रीचे रूपांतर त्रासात, लग्नासाठी दबाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि संशयित अभिषेक यांची २०२५ ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. मात्र, कालांतराने संशयिताने तरुणीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तरुणीने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याने तिचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे.

चौकात बोलावून मारहाण अन्

संशयिताने तरुणीला नाशिकरोड येथील नारायण बापू चौकात भेटण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संशयिताने तरुणीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच तिच्या हातातील सुमारे चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

खासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

तरुणीने लग्नास नकार कायम ठेवल्याने संशयिताने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. लग्न केले नाही तर तिचे इतरत्र लग्न होऊ देणार नाही, तसेच तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून बदनामी करेन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

तरुणीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

धमकीनंतर संशयिताने तरुणीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केले. या अकाउंटवर तिचा मूळ फोटो अपलोड करून तिच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागला. सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अभिषेक डहाळे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक आणि पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून एखाद्याची बदनामी करणे आणि लग्नासाठी जबरदस्तीने दबाव टाकणे हा गंभीर प्रकार असून, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >