Saturday, November 14, 2026

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते. याबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती देत हा क्षण आपल्या आयुष्यातील अतिशय खास आणि अभिमानाचा असल्याचे सांगितले. शनिवारी, 14 नोव्हेंबर 2026 रोजी ऑक्सफर्ड युनियनमध्ये भाषण करताना ललित मोदी यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी ब्रिटन हे गेल्या अनेक वर्षांपासून आपले घर असल्याचे सांगितले. तिथल्या लोकांबद्दल, संस्था, परंपरा आणि मूल्यांबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.

आपल्या पोस्टमध्ये ललित मोदी यांनी लिहिले की, ब्रिटिश नागरिक होणे ही केवळ एक संधी नाही तर ती एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण अभिमानाने, कृतज्ञतेने आणि आपलेपणाच्या भावनेने स्वीकारत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आज ऑक्सफर्ड युनियनमध्ये बोलण्याचा मान मिळाला. याच ठिकाणी मी माझ्या आयुष्यातील एक खास टप्पा सर्वांसोबत शेअर केला. मला ब्रिटिश नागरिक असल्याचा अभिमान आहे,” असे मोदी यांनी सांगितले. 15 सप्टेंबर रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा नागरिकत्व सोहळा पार पडला होता. हा सोहळा आपल्या मनात कायम विशेष स्थान ठेवेल, असेही त्यांनी म्हटले.

नव्या देशासाठी योगदान देण्याची इच्छा

आपल्या आयुष्याचा प्रवास वेगवेगळ्या संस्कृती आणि अनुभवांनी घडला असल्याचे ललित मोदी यांनी सांगितले. आता ज्या देशाला आपण आपले घर म्हणतो, त्या देशासाठी सकारात्मक योगदान देत राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या खास प्रसंगी कुटुंबीय, मित्र आणि ऑक्सफर्ड युनियनचे त्यांनी आभार मानले. हा दिवस आणखी खास ठरला तो म्हणजे याच दिवशी ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा वाढदिवस होता. राजांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घोषणा करता आली, याचा आपल्याला आनंद असल्याचे मोदी यांनी सांगितले. शेवटी त्यांनी “गॉड सेव्ह द किंग” असे लिहित पोस्टचा समारोप केला.

ललित मोदी हे आयपीएलच्या निर्मितीमुळे जगभरात ओळखले जातात. 2008 मध्ये सुरू झालेल्या आयपीएलमुळे क्रिकेटच्या जगात मोठा बदल झाला. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी त्यांच्या जुन्या वादग्रस्त प्रकरणांची आठवण करून देत टीका केली आहे. तरीही ललित मोदी यांनी या नव्या टप्प्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. आता ब्रिटिश नागरिक म्हणून नव्या अध्यायाला सुरुवात करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा