
छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखीचा फायदा घेत एका तरुणाने विवाहित महिलेला पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तब्बल दोन महिने तिचा छळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.
या प्रकरणी मयूर दिलीपचंद कासलीवाल (वय 35, रा. एन-2, सिडको) याच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
आधार कार्ड बनवण्याच्या निमित्ताने झाली होती ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती आणि दोन मुलांसह राहते. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी मुलांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी ती सिडकोतील एन-2 परिसरात असलेल्या 'प्रो. मयूर मल्टिसर्व्हिसेस' येथे गेली होती. त्यावेळी तिची मयूर कासलीवाल याच्याशी ओळख झाली होती.
तक्रारीनुसार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास महिला घरी एकटी असताना आरोपी दुचाकीवरून तिच्या घरी आला. 'तुझ्या पायगुणामुळे मला 50 लाख रुपयांची लॉटरी लागली,' असे सांगून त्याने आनंद व्यक्त केला आणि महिलेला पेढा खाऊ घातला. मात्र, पेढा खाल्ल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांतच महिलेला गुंगी आली आणि ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर आपल्यासोबत अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातून एक काळीज सुन्न करणारी घटना घडली आहे. एका ३३ वर्षीय मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या केली आहे. रेल्वे ...
फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग
आरोपीने महिलेच्या असहाय्य अवस्थेचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. त्याने या घटनेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला ब्लॅकमेल केले. तसेच, पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन 24 ऑगस्ट ते 25 ऑक्टोबर या कालावधीत वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.
विरोध करताच घरातील टीव्ही फोडला
25 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी पुन्हा महिलेच्या घरी आला. यावेळी महिलेने त्याला घरी येण्यास विरोध केला आणि पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने घरातील टीव्ही फोडल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.
पतीला सांगितला प्रकार, पोलिसांत धाव
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पतीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पत्नीची व्यथा ऐकल्यानंतर पतीने तिला धीर दिला. त्यानंतर दोघांनी छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मयूर कासलीवाल याच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत.





