जळगाव : जळगावमध्ये हृदयद्रावक घटना घडलीय. मुलगा विजेच्या धक्क्याने तडफडत असल्याचे पाहून त्याचा जीव वाचवण्यासाठी आईने क्षणाचाही विचार न करता धाव घेतली. मात्र, इथेच या मायलेकांना काळाने गाठले. जळगाव शहरातील आसोदा रोडवरील प्रवीण मोहन टॉकीज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. घराजवळ पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने आधी मुलाचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आईलाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील प्रवीण मोहन टॉकीज परिसरातील आसोदा रोडवर सपकाळे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ विद्युत वाहक तार खाली पडलेली होती. दरम्यान, राहुल सपकाळे (वय ३५) यांचा अचानक या विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच आई सुनंदा सपकाळे घाबरल्या. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत मायलेक दोघेही गंभीररीत्या भाजले आणि बेशुद्ध पडले.
Nashik : फटाक्यांची ठिणगी साडीवर पडली अन् अनर्थ घडला, 27 वर्षीय विवाहितेचा करुण अंत
नाशिक : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव. मात्र, याच दिवाळीत नाशिकमध्ये एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मीपूजनाच्या ...
रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर राहुल सपकाळे आणि सुनंदा सपकाळे या दोघांनाही मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील मायलेकांचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.