वांद्रे-वरळी सी-लिंकसमोर रिक्षा सफारीचाही घेतला आनंद
मुंबई : ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मुंबईतील प्रत्येक गोष्टीची आणि विशेषतः फॅशनची फॅशनप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. कधी गडद रंग तर कधी साधी आणि मोहक रंगसंगती, केट मिडलटन यांचे कपडे नेहमीच लक्ष वेधून घेतात. आपल्या मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केट यांनी आधुनिक पाश्चात्य पेहराव परिधान करतानाच त्यावर भारतीय पारंपारिक दागिन्यांचा एक सुंदर मेळ साधला. त्यांचा संपूर्ण पोशाख अतिशय रुबाबदार असला, तरी त्यांनी घातलेल्या चांदीच्या झुमक्यांनी त्यांच्या लूकला एक खास 'देसी टच' दिला होता.
वांद्रे-वरळी सी-लिंकसमोर रिक्षा सफारीची मौज
मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी या शाही दाम्पत्याने वांद्रे रिक्लेमेशन गार्डनला भेट दिली. यावेळी त्यांनी 'अर्थशॉट प्राईज २०२६' (Earthshot Prize 2026) साठी निवडलेल्या १५ अंतिम स्पर्धकांशी खास संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान या जोडीने अस्सल मुंबईकर अंदाजात एक आगळावेगळा अनुभव घेतला. पार्श्वभूमीला ऐतिहासिक वांद्रे-वरळी सी-लिंक उभा असताना, प्रिन्स विल्यम्स यांनी स्वतः एक इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा चालवली आणि केट यांनी मागच्या सीटवर बसून या मजेशीर रिक्षा सफारीचा मनमुराद आनंद लुटला.
आयव्हरी-व्हाईट पँटसूटमध्ये केट मिडलटनचा रुबाबदार अंदाज
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी निळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये झळकलेल्या केट यांनी दुसऱ्या दिवशी काहीसा सौम्य आणि शांत रंग निवडला. त्यांनी हस्तिदंती पांढऱ्या (आयव्हरी-व्हाईट) रंगाचा एक सुंदर पँटसूट घातला होता, ज्यामध्ये फॉर्मल लूक आणि सहजसुंदरता यांचा अप्रतिम समतोल दिसत होता. उत्तम प्रकारे शिवलेला ब्लेझर, त्यावर आकर्षक कॉलर आणि एका बटनाची रचना यामुळे त्यांचा लूक अधिकच फॉर्मल आणि क्लासी वाटत होता. त्याखाली त्यांनी पांढऱ्या रंगाचा व्ही-नेक ब्लाउज आणि मॅचिंग वाइड-लेग पँट घातली होती. एकाच रंगाच्या या पेहरावाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच उठाव दिला. कपड्यांच्या या साधेपणाला अधिक खुलवण्यासाठी केट यांनी गळ्यात एक नाजूक सोन्याचे पेंडंट आणि कानात लटकणारे चांदीचे पारंपारिक झुमके घातले, जे त्यांच्या लूकमधील मुख्य आकर्षण ठरले. मेकअप अत्यंत साधा ठेवत त्यांनी आपले केस मोकळे सोडले होते; डोळ्यांचा हलका मेकअप, गालावर थोडासा ब्लश आणि नैसर्गिक गुलाबी लिपस्टिकमुळे त्या अतिशय सुंदर दिसत होत्या.
प्रिन्स विल्यम्स यांचा आरामदायी आणि स्टायलिश 'स्मार्ट-कॅज्युअल' लूक
एका बाजूला केट यांनी 'बॉस-लेडी' लूक निवडला असताना, प्रिन्स विल्यम्स यांनी मात्र मुंबईतील दमट आणि उष्ण हवामान लक्षात घेऊन काहीसा निवांत व आरामदायी पेहराव पसंत केला. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या शर्टवर हलक्या निळ्या रंगाचा बारीक पट्ट्यांचा (पिनस्ट्राइप्ड) ब्लेझर चढवला होता. शर्टची वरची कॉलर थोडी मोकळी सोडून त्यांनी या फॉर्मल पोशाखाला एक कॅज्युअल आणि कूल टच दिला. ब्लेझरवरील बारीक पट्ट्यांमुळे त्यांच्या लूकमध्ये क्लासिक स्टाईल दिसत होती, तर गडद निळ्या रंगाच्या पँटने या संपूर्ण कपड्यांना उत्तम कॉन्ट्रास्ट दिला. पायांत तपकिरी रंगाचे (ब्राऊन) स्वेड शूज घालून त्यांनी हा टापटीप आणि आरामदायी लूक अगदी सहजपणे पूर्ण केला.