
मणिपूर : मणिपूरच्या पूर्व इम्फाळ जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळल्याने एका कॅप्टनचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जवान जखमी झाले. बुधवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास लमलाई चालू परिसरात हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात 8 व्या बिहार रेजिमेंटचे जवान होते.
गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया रेल्वे स्थानकावर एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक घटना घडली आहे, जिथे एका सतर्क महिला पोलिसाच्या धाडसामुळे प्रवाशाचा ...
या अपघातात 29 वर्षीय कॅप्टन हनुमान राम यांच्यासह चार जवान जखमी झाले होते. सर्व जखमींना उपचारासाठी बाबिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कॅप्टन हनुमान राम यांचा मृत्यू झाला. अन्य तीन जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमी जवानांमध्ये शिपाई माळी जयेश हिम्मत (24), शिपाई राकेश सरपेटे (37) आणि अग्निवीर अखिलेश कुमार शाह (19) यांचा समावेश आहे. वाहन नदीत नेमके कशामुळे कोसळले, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मणिपूरमध्ये 3 म्यानमार नागरिकांना अटक
दरम्यान, मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका वेगळ्या कारवाईत 10 किलोहून अधिक संशयित अमली पदार्थ जप्त केले असून, तीन म्यानमार नागरिकांना अटक केली आहे. मंगळवारी बेहियांग गावात ही कारवाई करण्यात आली.
बेहियांग पोलीस ठाण्याच्या पथकाने पावखानपियांग मिलुन (38), लिआनसिअनमिंथांग मिलुन (27) आणि पौखंटुआंग मिलुन (27) यांना ताब्यात घेतले. हे तिघेही म्यानमारमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
7.4 किलो WY गोळ्या आणि 3 किलो अफू जप्त
पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 7.4 किलो WY गोळ्या आणि 3 किलो अफू जप्त केले. याशिवाय तीन मोबाईल फोन आणि दोन केन्बो मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
या तिघांविरोधात अमली पदार्थ आणि मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS) तसेच परदेशी नागरिक कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






