उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ आल्या असताना समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गोरखपूरमध्ये बुधवारी 'पीडीए यात्रा' काढली होती. या रोड शो दरम्यान मोठी दुर्घटना घडली. रोड शोमध्ये सहभागी असलेल्या जेसीबीची धडक बसून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलगा स्थानिक भाजप नेत्याचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला आणि अखिलेश यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेवरून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीवर जोरदार टीका केली आहे. गोरखपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, "निसर्गाची काळजी तोच करेल ज्याच्या मनात संवेदना आहे. २०१७ पूर्वी इथे वन माफिया, खनन माफिया, कॅटल माफिया होते. काल समाजवादी पार्टीचा रोड शो होता. एका अल्पवयीन मुलाला त्यांनी आपल्या रोड शोचा बळी बनवलं. सपा म्हणजे गुंडागिरीचा पर्याय आहे, अराजकतेचा पर्याय आहे, दंगलींचा पर्याय आहे, कर्फ्यूचा पर्याय आहे. प्रत्येक माफिया त्यांचा सख्खा आहे आणि जनतेला त्यांनी नेहमीच धोका दिला आहे."
योगी पुढे म्हणाले, "त्या निरागस मुलाची चूक काय होती? कुत्र्याची शेपूट कधीच सरळ होत नाही, तसेच हे गुंड आणि माफिया जोपर्यंत काठीच्या जोरावर सरळ केले जात नाहीत, तोपर्यंत सरळ होणार नाहीत. आणि तेच आमचं सरकार करतंय. आम्ही त्यांची गुंडागिरी मोडून काढली आहे." कालची अराजकता पाहा, तो तरुण इथल्या एका नामांकित शाळेत शिकायला आला होता. वडिलांसोबत कुटुंबासह राहत होता. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि निर्लज्जपणाची हद्द म्हणजे माफियांचं पोषण करणारे हे लोक गप्प राहिले. संवेदनेचा एकही शब्द त्यांच्याकडे नव्हता, असंही योगी म्हणाले. या तरुणाच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो. आज संध्याकाळी मी त्या कुटुंबाला भेटायला जाणार आहे. ज्या गुंडांनी काल रस्त्यावर अराजकता माजवली, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्या गुंडांना शोधून काढा. त्यांना अशी शिक्षा मिळाली पाहिजे की अनेक पिढ्या लक्षात ठेवतील, असा इशाराही योगींनी दिला.
Yogi Aditynath : अखिलेश यांनी अयोध्येतून अर्ज भरला तर मीही मैदानात उतरणार; मुख्यमंत्री योगी यांचा पलटवार
उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilsh Yadav) यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर प्रदेशचे ...
योगी म्हणाले, "उत्तर प्रदेशचे रस्ते अराजकता निर्माण करण्यासाठी नाहीत. सामान्य जनतेला अडथळ्याविना ये-जा करता यावी, यासाठी आम्ही चांगले रस्ते बांधले आहेत. सपा आणि काँग्रेसच्या गुंडांनी येऊन अराजकता निर्माण करावी, यासाठी नाहीत. जर पुन्हा कुणी माफियागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्या माफियाला मातीत मिसळायला वेळ लागणार नाही." या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.