मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ‘झिम्मा’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा 2’ या दोन्ही चित्रपटांमधून महिलांच्या मैत्रीची, नात्यांची आणि सहलीदरम्यान रंगणाऱ्या धमाल किस्स्यांची सफर घडवणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा 3’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी चित्रपटात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत महिलांच्या सहलीभोवती फिरणारी ‘झिम्मा’ची गोष्ट आता पुरुषांच्या टोळीकडे वळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला असून, ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ म्हणत ही पुरुष मंडळी श्रीलंकेच्या सफरीवर निघाली आहेत.(Jhimma 3)
महिलांनंतर आता पुरुषांची टोळी करणार धमाल!
‘झिम्मा’च्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. महिलांच्या वेगवेगळ्या स्वभावांची, त्यांच्या मैत्रीची आणि सहलीदरम्यान घडणाऱ्या मजेशीर प्रसंगांची मांडणी प्रेक्षकांना विशेष भावली होती. मात्र, यावेळी हेमंत ढोमे यांनी कथेत वेगळा प्रयोग केला आहे. ‘झिम्मा 3’मध्ये महिलांऐवजी पुरुषांची टोळी सहलीला जाणार आहे. या टोळीत वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळे स्वभाव असलेली मंडळी एकत्र येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांमधील फरक, एकमेकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग पाहायला मिळणार आहेत.
Sai Pallavi new movie: ना रोमँटिक अंदाज, ना साधी भूमिका! साई पल्लवीने साकारली धाडसी IPS अधिकाऱ्याची भूमिका
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ‘मारी 2’ या ...
सिद्धार्थ चांदेकर ते अमेय वाघ; कलाकारांची तगडी फळी
या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र दिसणार आहेत. सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, सुयोग गोऱ्हे, राजन भिसे, उदय सबनीस, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि स्वतः हेमंत ढोमे यांचा या चित्रपटात समावेश आहे. विशेष म्हणजे, हेमंत ढोमे यावेळी केवळ लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर अभिनेता म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर ते पुन्हा अभिनय करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.(Jhimma 3 movie)
श्रीलंकेच्या निसर्गरम्य ठिकाणी रंगणार सहल
‘झिम्मा 3’मधील या पुरुष मंडळींची सहल श्रीलंकेत रंगणार आहे. वेगवेगळे स्वभाव, विचार आणि जगण्याच्या पद्धती असलेली ही मंडळी एकत्र प्रवासाला निघाल्यानंतर काय गोंधळ होणार, कोण कोणाशी मैत्री करणार आणि कोणाच्या स्वभावामुळे इतरांना अडचणींचा सामना करावा लागणार, याची झलक टीझरमधून पाहायला मिळते. श्रीलंकेतील सुंदर लोकेशन्स आणि कलाकारांची धमाल केमिस्ट्री यामुळे चित्रपटाची रंगत आणखी वाढणार आहे.
हेमंत ढोमे काय म्हणाले?
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितले की, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ला मिळालेल्या प्रेमानंतर तिसऱ्या भागात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. महिलांच्या सहलीतून अनेक सुंदर गोष्टी मांडल्यानंतर यावेळी पुरुषांच्या सहलीतून त्यांचे स्वभाव, गंमतीजमती आणि धमाल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पाच वर्षांनंतर अभिनय करण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव त्यांच्यासाठी विशेष असल्याचेही त्यांनी सांगितले.(Jhimma 3 new entry)
1 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
या चित्रपटाची निर्मिती क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी केली आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा 3’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी नववर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे नववर्षाची सुरुवात प्रेक्षकांना या धमाल मराठी चित्रपटासोबत करता येणार आहे. आतापर्यंत महिलांच्या सहलीतून मैत्रीचे विविध रंग दाखवणाऱ्या ‘झिम्मा’मध्ये यावेळी पुरुषांची टोळी काय धमाल करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टीझरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून, आता प्रेक्षकांना या भन्नाट सहलीची प्रतीक्षा लागली आहे.