मुंबई : व्यावसायिक जगातील कामगिरी आणि समाजकार्यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या नीता अंबानी (Nita Ambani) यांचे भारतीय शास्त्रीय नृत्यकलेशी खूप जवळचे नाते आहे. त्या स्वतः एक निष्णात भरतनाट्यम नृत्यांगना असून, नृत्याची ही साधना आणि आवड त्यांनी आजही जपून ठेवली आहे. आता त्या पुन्हा एकदा स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सज्ज झाल्या असून, भारताच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करणाऱ्या एका खास कार्यक्रमात त्या आपली नृत्यकला सादर करताना दिसणार आहेत.
नीता अंबानी (Nita Ambani) या कार्यक्रमासाठी किती मेहनत घेत आहेत, याची एक सुंदर झलक नुकतीच समोर आली आहे. २१ नोव्हेंबर रोजी 'स्वदेश ऑनलाईन'च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून त्यांच्या नृत्य सरावाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. मुंबईतील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) च्या 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' या पहिल्याच भव्य नाट्यप्रयोगात त्या सादरीकरण करणार आहेत. भारताचा प्राचीन काळ ते आजचा प्रवास आणि आपली संस्कृती उलगडून दाखवणाऱ्या या शोमध्ये नीता अंबानी यांचा सहभाग सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांनी हे नृत्य भारताच्या कलात्मक वारशाला आणि आपल्या वडिलांना एक मनस्वी आदरांजली म्हणून अर्पण केले आहे. नृत्याबद्दलचे त्यांचे प्रेम आणि देशाच्या संस्कृतीचा अभिमान या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळेल. "आमच्या संस्थापिका नीता अंबानी या भव्य नाट्यप्रयोगातील आपल्या सादरीकरणातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि नृत्यावरील आपल्या आयुष्यभराच्या प्रेमाला समर्पित होत आहेत. ही वैयक्तिक आदरांजली भारताच्या सांस्कृतिक कथेचा एक अविभाज्य भाग बनली आहे," असे त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या नृत्य सरावाइतकाच त्यांच्या पेहरावाचाही बोलबाला आहे. त्यांनी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी खास तयार केलेला गुलाबी रंगाचा हँडवोव्हन (हातमाग) आणि शिफॉनचा घागरा परिधान केला होता. हा पेहराव अत्यंत हलका आणि नाजूक कापडाचा असून, त्यावरील बारीक सोनेरी नक्षीकामाने त्यांच्या लूकला अधिकच खुलवले होते. भारताच्या कला आणि परंपरा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या थीमला साजेसा असाच हा नीता अंबानी यांचा पारंपरिक वेशभूषेतील अंदाज आहे. त्यामुळे त्यांचे हे नृत्य सादरीकरण प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.