Saturday, November 21, 2026

Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 84 धार्मिक संस्थांची नोंदणी, भाविकांची सेवा करणाऱ्या संस्थांना सरकार देणार आर्थिक मदत

नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी हळूहळू वेग घेत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची सेवा करण्यासाठी धार्मिक आणि सेवाभावी संस्थाही सज्ज होत आहेत. मात्र, या संस्थांना आता शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची प्रतीक्षा लागली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ८४ धार्मिक संस्थांची नोंदणी पूर्ण झाली असून, ३१ संस्थांनी पायाभूत सुविधांसाठी साडेपाच कोटींहून अधिक रुपयांचे प्रस्ताव सादर केले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांना निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात धार्मिक संस्थांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने भाविकांची सेवा करणाऱ्या धार्मिक व सेवाभावी संस्थांना पायाभूत सुविधांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार १९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये ४५ संस्थाने, १३ आश्रम, १२ आखाडे, सहा मंदिरे, पाच मठ आणि अन्य धार्मिक संस्थांसह एकूण ८४ संस्थांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३१ संस्थांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर केले असून, या प्रस्तावांची एकूण रक्कम ५ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपये इतकी आहे.

दरम्यान, नोंदणी केलेल्या ८४ संस्थांपैकी ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. यामध्ये नाशिक तालुक्यातील ३५, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २० संस्थांचा समावेश आहे. याशिवाय सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, चांदवडसह अन्य तालुक्यांतील संस्थांनीही नोंदणी केली आहे. तर उर्वरित १३ संस्था नाशिक जिल्ह्याबाहेरील आणि महाराष्ट्राबाहेरील आहेत. महत्त्वाचं म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संस्थांच्या अर्जांची आणि पायाभूत सुविधांच्या मागण्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, आता या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता कधी मिळणार आणि प्रत्यक्ष निधी कधी उपलब्ध होणार, याकडे संस्थांचे लक्ष लागले आहे.

प्रस्ताव सादर केलेल्या प्रत्येक संस्थेला मागणीनुसार निधी मिळेलच, असे नाही. संस्थेची पात्रता, भाविकांची संभाव्य गर्दी, सुविधांची गरज आणि कुंभमेळ्यातील योगदान या निकषांवर निधीचे वाटप होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याला अद्याप काही महिने बाकी असले, तरी पायाभूत सुविधांची उभारणी वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी मंजुरीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा धार्मिक संस्थांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >