कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या मागे असलेल्या प्रमोद महाजन या गार्डनमध्ये हा प्रकार घडला. हे किशोरवयीन जोडपे गार्डनमध्ये गेले असता काही अल्पवयीन मुलांच्या गटाने त्यांना घेरले आणि शिवीगाळ केली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जेव्हा त्या किशोरवयीन मुलांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मुलांनी त्यांना हॉकी स्टिकने मारहाण केली आणि बागेतून हाकलून दिले. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी ता जोडप्याशी संपर्क साधून एफआयआर नोंदवला.
शुक्रवारी (२० नोव्हेंबर) मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे तरुण आणि तरुणीवर सामूहिक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. फिनिक्स मॉलच्या परिसरातील मुंबई महापालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात हे जोडपे बसले असताना ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. समोर आलेल्या व्हिडीओनुसार, टोळक्याने तरुणाला घेरून बेल्ट, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणाने हल्लेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून मारहाण सुरूच राहिली. यावेळी तरुणीलाही मारहाण करण्यात आली. तिच्यावर काठी आणि बुक्क्यांनी हल्ला करण्यात आला, तसेच जोडप्याच्या दिशेने दगड फेकल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणात हल्ला करणारे आठ जण विधीसंघर्षित बालक असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची हिंसक कृती घडल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. या जोडप्यावर हल्ला करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी सांगितले की, कायद्याशी संघर्ष करणाऱ्या आठ अल्पवयीन मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२) (बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे), १८९(४) (घातक शस्त्र बाळगून बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे), ११८(१) (घातक शस्त्रे किंवा साधनांचा वापर करून स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (सार्वजनिक शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि ३५१ (२) (मूलभूत गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल. त्यांच्यात आधी काही वाद होता का हे निश्चित करण्यासाठी पोलीस त्या जोडप्याचे आणि मुलांचे जबाब नोंदवत आहेत. तसेच पोलिसांनी मुलांच्या पालकांना नोटीस पाठवली असून हल्ल्याचे कारण काय होते याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. शहरातील एका सार्वजनिक उद्यानात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.