मुंबई : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय भूषण ठाकरेने दिले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) 18 व्या पर्वात त्याने 1 कोटी रुपयांची रक्कम जिंकत पहिला करोडपती होण्याचा मान मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच्या या यशानंतर कार्यक्रमाच्या सेटवर जल्लोष झाला. सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या जागेवरून उठून भूषणला मिठी मारत त्याचे अभिनंदन केले.
वडिलांच्या आग्रहामुळे शिक्षणाला दिले प्राधान्य
भूषणने आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना कुटुंबातील कठीण परिस्थितीचा उल्लेख केला. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात, तर आईला अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला असून तिच्यावर शस्त्रक्रियाही झाल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी काम करण्याचा विचार भूषणने केला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याला नोकरी करण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरला. आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्याचे स्वप्न उराशी बाळगून भूषणने काहीतरी मोठे साध्य केल्याशिवाय घरी परतायचे नाही, असा निर्धार केला.
दीड वर्ष कुटुंबापासून दूर राहून केली मेहनत
भूषण एकेकाळी खिशात अवघे 24 रुपये घेऊन मुंबईत आला होता. आपल्या ध्येयासाठी त्याने गेल्या दीड वर्षांपासून कुटुंबापासून दूर राहून मेहनत केल्याचे सांगितले जाते. या काळात त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी आणि ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले.
आता 7 कोटींच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष
KBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर भूषणसमोर आता 7 कोटी रुपयांच्या महाजॅकपॉटचा प्रश्न आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने या भागाचा प्रोमो प्रदर्शित केला असून, त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. भूषण या अंतिम टप्प्यावर पोहोचतो का आणि 7 कोटींचे बक्षीस जिंकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.