
कॅनडाच्या सरे येथील वॉलमार्ट स्टोअरबाहेर भारतीय वंशाच्या एका जोडप्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून हा एक लक्ष्यीत गोळीबार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. २३ वर्षीय गगनप्रीत (गॅरी) रेहल आणि २४ वर्षीय सुखजीत कौर अशी ओळख पटलेले हे जोडपे १५ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३८ च्या सुमारास एका पार्किंग लॉटमध्ये गोळी लागलेल्या अवस्थेत आढळले. 'जेव्हा प्रथमोपचार पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा पुरुष आणि महिलेला पुनरुज्जीवित करण्याची प्रयत्न करण्यात आले. दोन्ही पीडितांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे थोड्याच वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले.' अशी माहिती सरे पोलिसांनी दिले.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही पीडित शेजारच्या डेल्टा टाउनशिपमध्ये राहत होते. कॅनडाचे सर्वात मोठे हत्या तपास पथक असलेल्या इंटिग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन टीमने (IHIT) आता या प्रकरणाचा ताबा घेतला आहे. रेहल शस्त्रास्त्रांच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना परिचित होता, तर कौरचे कॅनडामध्ये मर्यादित संपर्क होते. गोळीबाराच्या घटनेनंतर सुमारे १३ मिनिटांनी जवळच लागलेल्या एका कारच्या आगीचा संबंध या हत्यांशी असावा आणि जळालेले वाहन हेच संशयित वाहन असावे, असा पोलिसांचा विश्वास आहे. एका निवेदनात आयएचआयटीने म्हटले आहे की, हा गोळीबार लक्ष्यीत होता आणि त्याचा संबंध संघटित गुन्हेगारीशी होता, असा त्यांचा विश्वास आहे.
खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतत असताना महाराष्ट्रातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रविवारी मध्यरात्री कोटा उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर ...
तपासादरम्यान गोळीबारानंतर सुमारे १५ मिनिटांनी जाळण्यात आलेल्या एका वाहनाचाही संबंध समोर आला आहे. रात्री १०.५१ वाजता प्रिन्सेस ड्राईव्हच्या ९७०० ब्लॉकमध्ये वाहन जळत असल्याची माहिती मिळाली. हेच वाहन हल्लेखोरांनी वापरल्याचा संशय आहे. हा धागा तपासासाठी महत्त्वाचा ठरत आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. RED FM कॅनडाशी बोलताना गगनप्रीतच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा घटनेच्या काही मिनिटे आधीच घराबाहेर पडला होता. कौर ही त्याच्या मुलाची प्रेयसी असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी माझा मुलगा गमावला आहे. मी ट्रक ड्रायव्हर आहे, कॅल्गरीहून परत येत होतो, तेव्हा गोळीबाराची माहिती मिळाली. आता ते सांगतायत माझा मुलगा राहिला नाही. पोलीस मला सांगत नाहीयेत की मृतदेह कुठे नेला आहे, मला फक्त त्याला पाहायचंय," असं व्यथित वडिलांनी म्हटलं. पोलिसांनी दोघांचं वर्णन डेल्टाचे दक्षिण आशियाई रहिवासी असं केलं आहे. वॉलमार्ट पार्किंग सील करून पुरावे गोळा करण्यात आले. IHIT आणि सरे पोलीस आता संयुक्तपणे तपास करत आहेत.






