नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मस्जिद पोलीस ठाण्यामध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने थेट पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पाचपैकी तीन पोलिसांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने गंगाराम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर, इतर दोन जखमी पोलिसांवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर गोळी चालवून त्याला ताब्यात घेतले आहे.
आई आणि बहिणीला त्रास दिल्याच्या तक्रारीवरून बोलावले होते ठाण्यात
या संपूर्ण घटनेमागे घरगुती किंवा कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले आहे. हा तरुण आपल्या आईला आणि बहिणीला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला जामा मस्जिद पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू असतानाच त्याने अचानक भडकून पोलिसांवर चाकूने हल्ला केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी गोळीबार करत आरोपीला पकडले. सध्या जखमी पोलिसांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, या प्रकरणाची पुढील माहिती आणि तपास पुढे येत आहे.
बातमी पुढे अपडेट होत आहे...